ठाणे जिल्हा रुग्णालयातील प्रकार; यंत्रचालक नसल्याने रुग्णांची नाइलाजास्तव मुंबई वारी
सर्वसामान्य रुग्णांच्या उपचारासाठी जिल्ह्य़ातील एकमेव आशास्थान असलेल्या सिव्हिल रुग्णालयातील अपुऱ्या सुविधांमुळे नाइलाजाने मुंबईतील रुग्णालयात जावे लागते अथवा खासगी आरोग्य सुविधा स्वीकाराव्या लागतात. रुग्णालयात गेली दोन वर्षे सीटी स्कॅन यंत्रणा आहे, मात्र ती चालविण्यासाठी यंत्रचालक नसल्याने या सुविधेपासून रुग्णांना वंचित राहावे लागत आहे.
जिल्हा रुग्णालयात दररोज मोठय़ा प्रमाणात रुग्णांची वर्दळ असते. अस्वच्छतेच्या कारणासाठी जिल्हा रुग्णालय कुप्रसिद्ध असताना अपुऱ्या सुविधांमुळे जिल्हा रुग्णालयातील रुग्णांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रुग्णालयात हृदयरोगतज्ज्ञांची वानवा असतानाच सीटी स्कॅनचीही सुविधा नाही. जिल्हा रुग्णालयात दररोज किमान दहा ते बारा रुग्ण सीटी स्कॅन करून घेण्यासाठी येत असतात. मात्र रुग्णालयात सीटी स्कॅन यंत्र उपलब्ध असले तरी गेल्या दोन वर्षांपासून पडून आहे. कारण ते चालविण्यासाठी आवश्यक असलेले यंत्रचालकपद रिक्त आहे.
सोनोग्राफी, सीटी स्कॅन अशा सुविधा पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या अंतर्गत सुरू करण्याचे आदेश शासनाने दिले असल्याने सीटी स्कॅन सुविधा उपलब्ध करून देण्यास विलंब होत असल्याची माहिती रुग्णालयाचे अधीक्षक केम्पी पाटील यांनी दिली. जिल्हा पातळीवरील मोठय़ा रुग्णालयात सीटी स्कॅनची सुविधा नसल्याने रुग्णांकडून नाराजी व्यक्त केली े. सीटी स्कॅन करण्यासाठी रुग्ण गेले असता जिल्हा रुग्णालयात सीटी स्कॅनची सुविधा नसल्याचे सांगत खासगी रुग्णालयात किंवा मुंबईतील रुग्णालयात रुग्णांना पाठवण्यात येते. विशेष म्हणजे रुग्णालयातील काही डॉक्टरांचे खासगी दवाखाने असल्याने संबंधित डॉक्टर स्वत:च्याच दवाखान्यात उपचार करून घेण्याचा सल्ला रुग्णांना देतात, असा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे डॉक्टरांकडूनच असे प्रकार घडत असल्याने जिल्हा रुग्णालयाच्या विश्वासार्हतेचा प्रश्न उपस्थित होत आहे.

जिल्हा रुग्णालयातील सुविधा पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये उपलब्ध करून देण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. ही प्रक्रिया पूर्ण होण्यास कालावधी लागतो. दोन वर्षांपासून सीटी स्कॅन यंत्र बंद आहे. यंत्राची डागडुजी करून काही दिवसात सीटी स्कॅन यंत्र रुग्णांसाठी सुरू करण्यात येईल.
– केम्पी पाटील, अधीक्षक, ठाणे जिल्हा रुग्णालय