मंडप काढण्यास उशीर; प्रचारासाठी शेवटचे दोन दिवस; रहिवाशांची गैरसोय
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचे अवघे तीन दिवस शिल्लक राहिले असताना दिग्गज नेत्यांच्या सभांमुळे कल्याण-डोंबिवलीतील प्रमुख रस्ते बंद होऊ लागले आहेत. डोंबिवलीतील अप्पा दातार चौक यंदाही राजकीय नेत्यांच्या सभांचे मुख्य केंद्र ठरले असून येथील एकाच मंचावर ठाकरे बंधू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तोफा धडाडल्या खऱ्या, मात्र यामुळे फडके रस्ता मात्र मतदानानंतरच डोंबिवलीकरांसाठी खुला होईल, असे चित्र दिसत आहे.
डोंबिवलीतील गणेश पथावरील अप्पा दातार चौकास दिग्गज नेते सभेसाठी प्राधान्य देताना दिसतात. डोंबिवलीत भागशाळा मैदानाचा अपवाद वगळला तर मोक्याच्या ठिकाणी सभा होईल अशी मैदाने फारच अपवादात्मक आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसह प्रमुख राजकीय पक्षांचे नेते चौक आणि रस्ते अडवून सभा घेताना दिसत आहेत. नववर्ष स्वागत यात्रा आणि दिवाळी पहाटेला फडके रस्त्यावर तरुणाईची गर्दी उसळते. त्यामुळे हा रस्ता एका अर्थाने डोंबिवलीकरांसाठी आकर्षणाचा विषय असतो. येथील गणेश मंदिरामुळे डोंबिवलीकरांची पावले या रस्त्याच्या दिशेने सातत्याने वळत असतात. शिवाय कल्याण-ठाकुर्ली येथून येणाऱ्या नागरिकांचा या रस्त्यावर नेहमी राबता असतो.
कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूकही दिग्गज पक्षांसाठी अस्तित्वाची लढाई ठरल्याने त्यांनीही या निवडणुकीसाठी मैदाने निवडण्याऐवजी या चौकाची निवड केली आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या रस्त्यावर रविवारपासूनच मंडप उभारण्याचे काम सुरू आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसेचे राज ठाकरे व भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभांमुळे सलग तीन दिवस हा रस्ता खुला होण्याची शक्यताही नाही. यामुळे २९ तारखेपर्यंत रस्ता बंद राहणार आहे. त्यानंतरही मंडपाचे सामान काढण्यासाठी एक दिवस तरी लागणार असल्याने पुढील महिन्यातच हा रस्ता लोकांसाठी खुला होईल असे वातावरण आहे.

लोकसभेपासूनच सपाटा
अतिशय गर्दीचा असा हा रस्ता असल्याने तो अडविणे खरे तर येथील रहिवाशांसाठी सोयीचे नाही. मात्र, लोकसभा निवडणुकीपासूनच विविध पक्षांनी येथे जाहीर सभा घेण्याचा सपाटा लावल्याचे चित्र दिसत आहे.