News Flash

मोकळ्या जागांची वानवा..तरीही ठाणेकर समाधानी?

मोकळ्या जमिनी ही शहराची फुप्फुसे म्हणून ओळखली जातात.

मोकळ्या जमिनी ही शहराची फुप्फुसे म्हणून ओळखली जातात. ठाणे, कळवा आणि मुंब्रा या शहरांमध्ये गेल्या अनेक वर्षांत विविध सोयी, सुविधांसाठी आरक्षित असलेल्या मोकळ्या भूखंडांवर मोठय़ा प्रमाणावर अतिक्रमणे उभी राहिली आहेत. मैदाने, उद्याने यासाठी आरक्षित असलेले अनेक भूखंड या अतिक्रमणांनी यापूर्वीच गिळले आहेत. महापालिकेने तब्बल १५ वर्षांपूर्वी जाहीर केलेल्या शहरातील विकास आराखडय़ात मैदाने आणि उद्यानांसाठी आरक्षित ठेवण्यात आलेल्या एकूण भूखंडांपैकी तब्बल ४० टक्के जमिनींवर बेकायदा चाळी आणि बांधकामे उभी राहिली आहेत. हे ठसठशीत वास्तव समोर असतानाही महापालिकेने नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणात तब्बल ८० टक्के ठाणेकरांनी शहरातील मोकळी मैदाने आणि मनोरंजनाची साधने समाधानकारक असल्याचे म्हटले आहे. सुमारे एक लाख ठाणेकरांनी नोंदविलेल्या निरीक्षणातून ही टक्केवारी काढण्यात आली असली तरी मोकळ्या जागांची वानवा असलेल्या या शहरात असा निष्कर्ष काढणे अनेकांना धक्कादायक वाटू लागला आहे.

कल्याण डोंबिवलीच्या तुलनेत नियोजनाच्या आघाडीवर ठाण्याची परिस्थिती बरी असली तरी महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणाप्रमाणे आहे असा दावा कुणालाही करता येणार आहे. फेरीवाल्यांनी व्यापलेले पदपथ, अरुंद रस्ते, प्रमुख चौकांमध्ये होणारी वाहनांची कोंडी आणि बेकायदा पार्किंगने व्यापलेले सेवा रस्ते अशा समस्या ठाणेकरांना वर्षांनुवर्षे भेडसावत आहेत. असे असताना स्मार्ट सिटीसाठी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ५२ टक्के ठाणेकरांना शहरातून चालणे आणि सायकल चालविणे सहज शक्य आहे असे वाटते. सर्वेक्षणातील इतर तपशिलांच्या तुलनेत हा आकडा फारसा समाधानकारक नसला तरी महापालिका प्रशासनाला मात्र सार्वजनिक सुविधांच्या आघाडीवर सर्व काही आलबेल असल्याचे अचानक वाटू लागले आहे. महापालिकेने मागविलेल्या सूचनांच्या यादीत कळबा आणि मुंब््रयातील रहिवाशांचा समावेश असेल तर या सुविधा त्यांना समाधानकारक वाटणे जवळपास अशक्य आहे. कळव्याच्या अनेक भागात माणसांना चालण्यास पुरेशी जागा नाही. पदपथ नावाचा प्रकार तर या उपनगरात अपवादाने आढळतो. अशा परिस्थितीत चालणे आणि सायकल चालविणे कळव्यात सहज शक्य आहे असे मत नोंदविणारे कळवेकर अपवादानेच आढळावेत. ठाणे महापालिकेने काही वर्षांपूर्वी किसननगर भागात सायकलस्वारांसाठी स्वतंत्र्य मार्गिकांची आखणी केली होती. प्रदूषण विरहीत दळणवळणास प्रोत्साहन मिळावे यासाठी हा प्रयोग राबविण्यात आला होता. पुढे आयुक्त बदलले आणि महापालिकेच्या कामकाजाची दिशाही बदलली. किसननगरमधील ‘त्या’ सायकल मार्गिकेवर रिक्षा चालकांचे अतिक्रमण झाले आहे.
आर.ए.राजीव यांच्या आयुक्तपदाच्या काळात त्यांनी शहरातील पदपथांवर हिरवे पट्टे तयार करण्याच्या प्रयोग यशस्वीरित्या राबविला. शहरातील खासगी विकसकांच्या पुढाकारातून पदपथांचे रुंदीकरण करण्यात आले, शिवाय त्यावर हिरवे पट्टे तयार करून जॉगिंग ट्रक तयार करण्यात आले. राजीव यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा प्रयोग एव्हाना तुफान यशस्वी ठरला आहे. पदपथांवर साकारलेल्या हिरव्या पट्टयांवर व्यायाम आणि जॉगिंग करण्यासाठी मोठय़ा संख्येने ठाणेकर जमू लागले आहे. वरवर पहाता हा प्रयोग यशस्वी दिसत असला तरी या शहरात मोकळ्या जागांची किती वानवा आहे हेदेखील यावरून दिसून आले. ठाणे शहरातील सेन्ट्रल मैदानाला ऐतिहासिक वारसा लाभला असला तरी अशा प्रकारच्या मोकळया जागांचे इतर भागात जतन करणे महापालिकेस इतक्या वर्षांत जमलेले नाही. मूळ शहराला पुरेसे नियोजन नाही हा दावा खरा मानला तरी नव्याने उभ्या राहिलेल्या वर्तकनगर, घोडबंदर पट्टयातही पुरेशा प्रमाणात मैदाने आणि उद्याने नाहीत. ठाणे महापालिकेने तयार केलेल्या विकास आराखडय़ात मैदाने आणि उद्यानांसाठी आरक्षित असलेल्या जागांवर मोठय़ा प्रमाणावर झालेल्या अतिक्रमणामुळे शहराची फुप्फुसे आक्रसून गेली आहेत. अशा परिस्थितीतही एक लाख ठाणेकरांपैकी ७९ टक्क्य़ांना शहरात पुरेशी मैदाने, उद्याने आणि मनोरंजनाची साधने आहेत असे वाटत असेल तर आश्चर्यच म्हणावे लागेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 10, 2015 4:43 am

Web Title: no empty land in thane
टॅग : Thane
Next Stories
1 गगनस्पर्शी गोरखगड
2 ‘डायमेन्शन’मध्ये सुपरहिरोंची मांदियाळी
3 गोवेली महाविद्यालयात एड्स जनजागृती सप्ताह
Just Now!
X