गेल्या दीड वर्षांपासून रखडलेल्या पत्रीपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असून या पुलावर सध्या गर्डर टाकण्यात येत आहे. हे अवजड गर्डर टाकताना पुलावर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी महामंडळाने रात्री १० ते पहाटे ५ ही वेळ निवडली असून येत्या सोमवापर्यंत हे काम पूर्ण केले जाणार आहे. त्यामुळे या काळात पुलावर रात्रीच्या वेळी वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली असून या वेळेत वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.

वाहतुकीसाठी धोकादायक झालेला पत्रीपूल नोव्हेंबर २०१८ मध्ये तोडण्यात आला होता. त्यानंतर या पुलाचे काम जलदगतीने पूर्ण केले जाईल, अशी आश्वासने राजकीय नेत्यांकडून देण्यात येत होती. प्रत्यक्षात मात्र, गेल्या दीड वर्षांपासून या पुलाचे काम रखडले आहे. त्यामुळे कल्याण शहरात वाहतुकीची समस्या वाढू लागली आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांत या पुलाच्या कामाने चांगली गती पकडली होती. मात्र, करोनाच्या संकटामुळे या पुलाचे काम बंद होते. आता पुन्हा या पुलाच्या कामाला वेगाने सुरुवात झाली असून सध्या पुलावर गर्डर टाकण्याचे काम सुरू आहे.

गर्डर टाकताना पुलावर वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी रात्रीची वेळ निवडण्यात आली असून सोमवापर्यंत रात्री १० ते सकाळी ५ या वेळेत हे काम पूर्ण केले जाणार आहे. या कामासाठी एक मोठी क्रेन जुन्या पुलावर उभी केली जाणार आहे. त्यामुळे या पुलावरील वाहतूक सोमवार २४ ऑगस्टपर्यंत रात्री १० ते सकाळी ५ या वेळेत बंद ठेवली जाणार असून या वेळेत कल्याण-शीळ मार्गावरून जाणाऱ्या अवजड वाहनांना रांजनोली नाक्यावरून प्रवेश बंद करण्यात आला आहे. सोमवार २४ ऑगस्टपर्यंत वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले असून वाहनचालकांनी हे बदल लक्षात घेऊन प्रवास करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे उपायुक्त अमित काळे यांनी केले.

वाहतुकीत बदल काय?

* कल्याण-शीळ मार्गावरील वाहतूक रांजनोली नाक्यावरून भिवंडी येथून खारेगाव टोलनाका-मुंब्रा बायपासमार्गे रवाना केली जात आहे.

* कल्याण-शीळ रोडवरून जाणाऱ्या हलक्या वाहनांना दुर्गामाता चौकात प्रवेश बंद करण्यात आला असून ही वाहने आधारवाडी चौक-खडकपाडा चौक-वालधुनी पुलावरून कल्याण पूर्वेत वळवली जात आहे.

* कल्याण-नगर मार्गावरील वाहनांना सुभाष चौकात प्रवेश बंद करण्यात आला असून ही वाहने नेताजी सुभाष चौकमार्गे वालधुनी पुलावरून मार्गस्थ केली जात आहेत.

* कल्याण-शीळफाटा रोडवरून पत्रीपुलाकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना सूचक नाका येथे प्रवेश बंद करण्यात आला असून ही वाहने कल्याण पूर्वेतील सूचक नाका येथे उजवीकडे वळवून सोडली जात आहेत.

* कल्याण पश्चिमेकडे जाणारी वाहने कल्याण फाटय़ावरून खारेगाव टोलनाकामार्गे रवाना केली जात आहेत.