अंबरनाथ-बदलापुरात गर्दी नियंत्रणासाठी विशेष नियमावली जाहीर

अंबरनाथ : संचारबंदी असतानाही अंबरनाथ आणि बदलापूर शहरात मोठय़ा प्रमाणावर नागरिक भाजी मंडई, दुकाने आणि रस्त्यांवर गर्दी करीत आहेत. त्यामुळे अंबरनाथ तालुका प्रशासनाने नवी नियमावली जाहीर केली आहे. कोणत्याही दुकानात प्रवेश करताना चेहऱ्याला मास्क लावणे अनिवार्य करण्यात आले असून दुचाकीवरही एकच व्यक्ती प्रवास करू शकणार आहे. दुकान मालकांनीही गर्दीचे नियोजन करत र्निजतुकीकरण सुविधाही उपलब्ध करायची आहे. तहसील, पालिका, पोलीस आणि व्यापारी प्रतिनिधींच्या बैठकीत अशाप्रकारचे निर्णय घेण्यात आले आहेत.

गर्दी कमी होत नसल्याने पालिका आणि पोलीस प्रशासन हतबल झाल्याचे चित्र सोमवारी सायंकाळनंतर पाहायला मिळाले. त्यावर उपाययोजना करण्यासाठी अंबरनाथ तालुक्याचे तहसीलदार जयराय देशमुख यांनी स्थानिक आमदार, पोलीस, पालिका, शिधा विक्रेते आणि व्यापाऱ्यांची संयुक्त बैठक मंगळवारी घेतली. यावेळी गर्दी टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. भाजीपाला, किराणा, दूध आणि औषधे घेण्यासाठी नागरिक घराबाहेर पडत असल्याचे दिसते आहे. मात्र त्यासह इतर काही नागरिक फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडत असल्याचेही दिसून आल्याने यापुढे दुचाकीवर एकाच व्यक्तीला आवश्यक कामासाठी बाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच दुकानात जाणाऱ्या व्यक्तीला चेहऱ्यावर मास्क लावणे आनिवार्य करण्यात आले आहे. त्याचवेळी दुकान मालकांनीही दुकानात होणारी गर्दी नियंत्रणात ठेवणे गरजेचे असल्याचे यावेळी निश्चित करण्यात आले आहे.

दुकानदार, औषधालयातील कर्मचाऱ्यांनी मास्कशिवाय वस्तूंची विक्री करू नये, असे आदेशही यावेळी देण्यात आले. शिधावाटप केंद्रावर पुरेसा साठा उपलब्ध करावा, दुकानदारांनी चढय़ा दराने वस्तूंची विक्री करू नये याबाबतही सूचना देण्यात आल्या. यावेळी नागरिकांनीही गरज असल्याशिवाय बाहेर पडू नये, असे आवाहन तहसीलदार देशमुख यांनी यावेळी केले.

लाठय़ांचा प्रसाद

संचारबंदीनंतरही मंगळवारी नागरिकांनी सकाळीच भाजी मंडई आणि दूध दुकानांवर गर्दी केली होती. काही रहिवासी संकुलात, बंद आणि निर्माणाधीन इमारतींमध्ये काही तरुण एकत्र येत असल्याचे दिसून येत होते. समाज माध्यमांवरून अनेक नागरिक याबाबतच्या तक्रारी करताना दिसले. काही ठिकाणी गप्पांचे फड रंगताना दिसले तर काही ठिकाणी तरुण एकत्र येऊन क्रिकेट खेळताना पाहायला मिळाले. त्यामुळे नागरिकांमध्ये संचारबंदीबाबत आणि करोनाबाबत कोणतीही गंभीरता दिसून येत नव्हती. मुख्य रस्त्यांवर फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडणाऱ्या तरुणांना पोलिसांच्या लाठय़ांचा प्रसाद खावा लागला.