News Flash

शहरबात  : नावालाच चौथी मुंबई

 करोनाचा शिरकाव अंबरनाथ आणि बदलापूर शहरांत जरा उशिरानेच झाला.

सागर नरेकर

मुंबईच्या धर्तीवर विविध सुविधा असलेली गृहसंकुले उभी राहात असल्याने आणि मुंबईचा मध्यमवर्ग स्थलांतरित होत असल्याने उपनगरीय रेल्वे मार्गाने कल्याणपल्याड असलेल्या अंबरनाथ आणि बदलापूर शहरांना गेल्या काही वर्षांत चौथी मुंबई म्हणून संबोधले जाऊ  लागले. मात्र खरी मुंबई चालवणाऱ्या नोकरदारांच्या जिवावर उभ्या राहणाऱ्या या चौथ्या मुंबईच्या तोंडाला आरोग्य सुविधेच्या नावाने पाने पुसल्याचा प्रकार करोनाच्या निमित्ताने समोर आला. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या लेखी विकास म्हणजे रस्ते, तर लोकप्रतिनिधींच्या गावी आरोग्य हा विषयच नसल्याचे यानिमित्ताने अधोरेखित झाले. त्यामुळे ही शहरे फक्त नावालाच चौथी मुंबई म्हणून संबोधली जात असल्याचे दिसते आहे.

मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि डोंबिवली-कल्याण या शहरांची नागरिकांना सामावून घेण्याची क्षमता जवळपास संपल्याने आणि मध्यमवर्गीयांच्या हाताबाहेर गेलेल्या घरांच्या किमतींमुळे गेल्या काही वर्षांत कल्याणपल्याड असलेल्या अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांमध्ये स्थलांतरण वाढले. मुंबई, नवी मुंबई, ठाणे महापालिका, मंत्रालय, मुंबईतील विविध महत्त्वाची शासकीय कार्यालये, रेल्वे सेवा अशा शासकीय सेवांमध्ये कार्यरत असलेले अनेक अधिकारी, कर्मचारी, वैद्यकीय कर्मचारी, निवृत्त सेवक तसेच कलाकार, खेळाडू गेल्या काही वर्षांत अंबरनाथ आणि बदलापूर शहरांकडे वळाले. खऱ्या अर्थाने मुंबई चालवणारा वर्ग या शहरांमध्ये स्थलांतरित झाल्याने राजकीय नेते आणि बांधकाम व्यावसायिकांनी या शहरांना चौथी मुंबई म्हणून संबोधण्यास सुरुवात केली. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या क्षेत्रात या शहरांचा समावेश झाल्याने रस्ते आणि दळणवळणाच्या विविध वाहतूक प्रकल्पांना येथे मंजुरी देण्यात आली. इतकेच काय तर डोंबिवली- अंबरनाथ- बदलापूर या मेट्रो मार्गालाही तत्त्वत: मंजुरी देण्यात आली आहे. शहरांच्या प्राथमिक गरजा पूर्ण झाल्याचा समज झाल्याने लोकप्रतिनिधींचे लक्ष कलाशून्य कलादालने, दिशादर्शक कमानी, प्रवेशद्वार, चौक सुशोभीकरण, स्मारके आणि पुतळ्यांकडे वळले आहे. मात्र करोनाच्या काळात या शहरांमध्ये आरोग्याच्या सुविधा किती तोकडय़ा आहेत हेही खऱ्या अर्थाने सिद्ध झाले आहे. आज अंबरनाथ आणि बदलापूर शहरात करोना रुग्णांसाठी एकही अतिदक्षता विभागाची खाट किंवा व्हेंटिलेटरची सुविधा शिल्लक नाही. गेल्या काही आठवडय़ांपासून पालिकांचे प्रशासन प्राणवायूसाठी धावपळ करत आहे. साध्या साध्या औषधांसाठी थेट जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांच्या दारात जाण्याची वेळ या दिवसांत आली आहे. इतकी भयाण परिस्थिती असताना या दोन्ही शहरांना दिलेला चौथ्या मुंबईचा दर्जा हा नावालाच असल्याचे दिसते आहे.

करोनाचा शिरकाव अंबरनाथ आणि बदलापूर शहरांत जरा उशिरानेच झाला. त्या वेळी अंबरनाथ शहरात मृत्युशय्येवर असलेले आणि पालिकेने आपल्यापासून सुटका करून राज्य शासनाच्या हाती सुपूर्द केलेले उपजिल्हा रुग्णालय होते. तर बदलापूर शहरात कुळगाव बदलापूर नगरपालिकेत बाह्य़रुग्ण विभाग आणि लहानग्यांचे लसीकरण करणारे कै. शिवबाबा दुबे रुग्णालय अस्तित्वात होते. ग्रामीण भागाचा भार वाहणारे उपजिल्हा रुग्णालय दर्जाचे ग्रामीण रुग्णालयही शहराच्या वेशीवर होतेच. मात्र त्याचा शहराला उपयोग फक्त अपघात, गुन्ह्य़ांतील मृत व्यक्तींच्या प्राथमिक तपासणीपुरताच मर्यादित होता. त्याखेरीज दोन्ही शहरांमध्ये हाताच्या बोटावर मोजण्याइतकी खासगी रुग्णालये होती. सुरुवातीच्या काळात पालिका प्रशासनाने आपल्या मर्यादा दाखवत आरोग्य यंत्रणा उभारण्यात चालढकल केली. त्यामुळे मागील मार्चमध्ये टाळेबंदी झाली असली तरी आरोग्य व्यवस्था उभारण्यासाठी अंबरनाथ शहरात जून, तर बदलापूर शहरात मेअखेर उजाडावा लागला. त्यातही सप्टेंबर महिन्यापर्यंत दोन्ही शहरांत गंभीर रुग्णांसाठी कोणतीही व्यवस्था नव्हती. अशा रुग्णांना ठाणे, मुंबईतील रुग्णालये आणि खासगी रुग्णालयांशिवाय पर्याय नव्हता. शहराचे तारणहार म्हणून मिरवणाऱ्या लोकप्रतिनिधींची ध्येयदृष्टी किती तोकडी होती हे यानिमित्ताने प्रकाशझोतात आले. दोन्ही शहरांची लोकसंख्या साडेसात ते आठ लाखांच्या घरात आहे. दोन्ही शहरांत आरोग्य व्यवस्थेच्या नावाने आनंदीआनंदच आहे. महापालिकांच्या स्थापनेला विरोध केल्याने मुंबई महानगर क्षेत्रातल्या या अवघ्या दोनच नगरपालिका शिल्लक आहेत. त्यामुळे प्रशासकीय नेतृत्व शहराला मिळू शकलेले नाही. दोन्ही शहरांना तीन ते चार कार्यकालाचा अनुभव असलेले आमदार लाभले आहेत. मात्र तरीही या दोन्ही शहरांमध्ये गेल्या काही वर्षांत एकही रुग्णालय उभे राहू शकलेले नाही. करोनाचा काळ सुरू झाल्यानंतर शहराला पुरेशा रुग्णवाहिका उपलब्ध झाल्या. तोपर्यंत खासगी रुग्णवाहिकांवरच रुग्णांचा भार होता. करोनाच्या पूर्वीपर्यंत एकाही लोकप्रतिनिधीच्या अजेंडय़ावर आरोग्य व्यवस्था, रुग्णालय, रुग्णवाहिका हा विषय नव्हता. शहरात थेट मेट्रो, उड्डाणपूल, स्मारके, कलादालने, चौक सुशोभीकरण, पुतळे आणि उद्याने यांचीच चर्चा सुरू होती. शहरातले नागरिकही यालाच विकास समजू लागले होते. मात्र करोनाच्या निमित्ताने विकासाच्या नव्या व्याख्या नागरिकांना उमगू लागल्या आहेत.

आजच्या घडीला दोन्ही शहरांतील रुग्णांची संख्या ३० हजारांच्या पार गेली आहे. कोणत्याही रुग्णालयांमध्ये एकही जागा उपलब्ध नाही. अतिदक्षता विभागातील खाटा शोधण्यासाठी थेट मुंबई गाठावी लागते आहे. रेमडेसिविरसारखी औषधे, प्राणवायू  मिळवता मिळवता लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि रुग्णांच्या नातेवाईकांच्या नाकीनऊ  येत आहेत. चाकरमान्यांची शहरे म्हणून ओळख मिळवत असलेली ही शहरे गेल्या काही वर्षांत चौथी मुंबई म्हणून संबोधली जाऊ  लागली. मात्र मुंबईच्या धर्तीवर येथे फक्त रस्ते, इमारती उभ्या राहिल्या. आरोग्य सुविधांच्या बाबतीत चौथी मुंबई फक्त नावालाच असल्याचे करोनाच्या निमित्ताने सिद्ध केले आहे. त्यामुळे करोनोत्तर काळात चौथ्या मुंबईला मुंबईच्या धर्तीवर रुग्णालये, वैद्यकीय सुविधा देऊन खऱ्या अर्थाने मुंबई करणे आवश्यक आहे. अन्यथा चौथी मुंबई हे संबोधन नाही तर फक्त हिणवणे ठरेल यात शंका नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2021 1:32 am

Web Title: no health facilities in fourth mumbai ambernath and badlapur zws 70
Next Stories
1 हळदी, लग्न सोहळ्यांतील गर्दी कायम
2 बिगर करोना रुग्णालयांनाही रेमडेसिविरचा पुरवठा करा
3 कळवा, मुंब्य्रातील करोना रुग्णालये प्राणवायू पुरवठ्याअभावी बंद