नोटाबंदीमुळे त्रास सहन कराव्या लागत असलेल्या ठाणेकरांच्या अडचणीत आता आणखीनच भर पडणार आहे. ठाणे शहरातील अनेक मोबाईल टॉवर्सवर आजपासून जप्तीच्या कारवाईला सुरूवात झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील अनेक सोसायट्यांच्या परिसरात विविध कंपन्यांचे मोबाईल टॉवर्स आहेत. सोसायटीच्या परिसरात हे टॉवर्स लावण्यासाठी मोबाईल कंपन्यांकडून सोसायट्यांना पैसे दिली जातात. सोसायट्यांना अशाप्रकारे मिळणाऱ्या उत्त्पन्नांवर सरकारकडून वर्षाला साधारण ३६ हजार रूपये इतका कर आकारला जातो. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून ठाण्यातील अनेक सोसायट्यांनी हा कर भरलेलाच नाही. त्यामुळे आता प्रशासनाकडून हे मोबाईल टॉवर्स जप्त करून त्यांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे.

त्यामुळे या टॉवर्सच्या परिसरातील नेटवर्क गायब होणार आहे. आतापर्यंत टेंभीनाका आणि कळवा परिसरातील १५ मोबाईल टॉवर्स स्वीच ऑफ करण्यात आले आहेत. त्यामुळे या भागातील संबंधित कंपन्यांचे मोबाईल नेटवर्क गायब झाले आहे. आज संध्याकाळपर्यंत तब्बल १०० मोबाईल टॉवर्सचा वीजपुरवठा खंडित करण्यात येईल. त्यामुळे ठाण्यातील मोबाईधारकांना मोठ्याप्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागणार आहे.