भाईंदर : करोनाची सौम्य आणि मध्यम लक्षणे असेलल्याा रुग्णांना यापुढे घरात विलगीकरणात राहता येणार नाही. या काळात रुग्ण घराबाहेर पडत असल्याने संक्रमणाचा धोका वाढत असल्याने पालिकेने हा निर्णय घेतला आहे.

मीरा-भाईंदर शहरात करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ होत आहे. आतापर्यंत चार हजारांहून अधिक रुग्णांना करोनाची लागण झाली आहे. तर १६२ रुग्णांच्या बळीची नोंद करण्यात आली आहे. दिवसाला सरासरी दीडशे रुग्णांची वाढ होत आहे. करोनाचा संसर्ग झाला तरीही बहुतांश रुग्णात सौम्य लक्षणे असतात. अशा रुग्णांना केंद्र शासनाच्या नव्या नियमावलीनुसार घरातच अलगीकरण करण्याची परवानगी देण्यात आली होती. परंतु मीरा-भाईंदर शहरात घरी विलगीकरण न करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.

पालिकेच्या रुग्णालयात आणि करोना उपचार केंद्रात या रुग्णांना ठेवल्यास त्यांच्यावर लवकर आणि प्रभावी उपचार करता येतील, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पालिका आयुक्त डॉ. विजय राठोड यांनी दिली.

अनेक रुग्ण घराबाहेर

घरी विलगीकरण केले असता अनेक रुग्ण घरा बाहेर पडत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. तसेच बाधित रुग्णावर सात दिवस लक्ष ठेवण्याची गरज असते. कारण त्या रुग्णांची ऑक्सिजन पातळी खाली येऊन प्रकृती बिघडण्याची शक्यता असते. तसेच बाधित रुग्णांमुळे करोनाचा प्रसार अधिक  होण्याची शक्यता असल्यामुळे पालिकेच्याच विलगीकरण कक्षात रुग्णांना ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.