News Flash

ठाणेकरांनो.. नव्या बसफेऱ्या विसरा!

‘शेजाऱ्यां’च्या बससेवेचा दिलासा

‘टीएमटी’ प्रशासनाने हात टेकले
ठाणे शहरातील अंतर्गत तसेच मुंबई, नवी मुंबई, कल्याण या आसपासच्या शहरांतील प्रवासासाठी उपयुक्त ठरणाऱ्या ठाणे महानगर परिवहन उपक्रमाच्या (टीएमटी) बससेवा सुधारण्याची किंवा त्यात वाढ होण्याची आस लावून बसलेल्या ठाणेकरांना टीएमटी प्रशासनाने वाईट बातमी दिली आहे. सद्य:स्थितीत परिवहन सेवेचा बसताफा अपुरा असून ताफ्यातील अनेक बसेस नादुरुस्त आहेत. बस दुरुस्तीची कामे तातडीने हाती घेण्यात आली असली तरी सध्या चालविण्यात येत असलेल्या मार्गावरच बससेवा अपुरी आहे. असे असताना नव्या फेऱ्या सुरू करणे तूर्तास शक्य नाही, अशी स्पष्ट कबुली टीएमटी प्रशासनाने दिली आहे.
ठाणे महापालिका परिवहन उपक्रमात सद्य:स्थितीत ३०० पेक्षा अधिक बसेस असल्या तरी नादुरुस्त गाडय़ांची रडकथा अजूनही कायम आहे. उपक्रमातील सुमारे ७० पेक्षा अधिक बसेस नादुरुस्त असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत असून त्यामुळे दिवसाला २०० बसेस आगाराबाहेर काढताना परिवहन उपक्रमाच्या अक्षरश: नाकीनऊ येत आहेत. ठाणे, कळवा आणि मुंब्रा या शहरांचे झपाटय़ाने होत असलेले नागरीकरण लक्षात घेऊन टीएमटीच्या ताफ्यात नव्या बसेस खरेदी करण्याचा प्रस्ताव काही महिन्यांपूर्वी मंजूर करण्यात आला आहे. याशिवाय खासगी तत्त्वावर काही बसेस सुरू करून सध्याच्या व्यवस्थेवर पडणारा भार कमी करण्याचा प्रस्तावही मान्य करण्यात आला आहे. असे असले तरी नव्या बसेस आणि व्यवस्था अस्तित्वात येत नाही तोवर ठाणेकरांच्या नशिबी रडतखडत होणारा प्रवास कायम राहण्याची चिन्हे अधिक दिसू लागली आहेत.
ठाणे महापालिकेचे विरोधी पक्षनेते संजय भोईर यांनी मध्यंतरी टीएमटी प्रशासनाला पत्र पाठवून काही मार्गावर अतिरिक्त फेऱ्या सुऱ्या करण्याची मागणी लावून धरली होती. ठाणे रेल्वे स्थानक ते घोडबंदर मार्गावर प्रवाशांचा भार मोठय़ा प्रमाणावर वाढला आहे. हे लक्षात घेऊन ठाणे ते ढोकाळी नाका, रुणवाल गार्डन सिटी, एव्हरेस्ट वर्ल्ड या मार्गावर फेऱ्या वाढवाव्यात अशा स्वरूपाचा प्रस्ताव भोईर यांनी मांडला होता. मात्र, बसेसची संख्या अपुरी असल्याचे कारण देत परिवहन प्रशासनाने ही मागणी अमान्य केलीच, शिवाय इतर कोणत्याही मार्गावर नव्या फेऱ्या सुरू करणे तूर्तास शक्य नाही, अशी स्पष्ट कबुलीही दिली आहे. परिवहनच्या बस ताफ्यात वाढ झाल्यानंतर या मार्गावर बसेस सुरू करण्याचा विचार प्राधान्याने करण्यात येईल, असे परिवहन प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ‘टीएमटीच्या ताफ्यातील अनेक बसेस नादुरुस्त अवस्थेत असून त्यांची कामे प्राधान्याने हाती घेतली आहेत. त्यामुळे बस दुरुस्ती करून मार्गस्थ होण्यास आणखी काही कालावधी लागणार आहे,’ असे उत्तर परिवहन व्यवस्थापक सुधीर राऊत यांनी दिले आहे.
‘शेजाऱ्यां’च्या बससेवेचा दिलासा
खासगी प्रवासी वाहतूकदारांचा बंद; टीएमटी नादुरुस्त
खास प्रतिनिधी, ठाणे
ठाणे वाहतूक पोलिसांनी हाती घेतलेल्या जोरदार मोहिमेमुळे ठाणे पूर्व स्थानक ते घोडबंदर मार्गावर अवैधरीत्या सुरू असलेली खासगी बस वाहतूक गेल्या काही दिवसांपासून बंद पडली आहे. टीएमटी बससेवा सावळागोंधळ सुरू असल्याने रेल्वे स्थानक ते घोडबंदर मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही सेवा सोयीची ठरते. पोलिसांच्या कारवाईमुळे प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता वर्तवली जात असताना मुंबई, वसई-विरार तसेच नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमांनी आपल्या बसफेऱ्या आणि सेवा वाढवल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
ठाणे परिवहन उपक्रमाची बससेवा वर्षांचे बाराही महिने आजारीच असते. त्यामुळे या बससेवेवरून ठाणेकरांचा विश्वास उडत चालल्याचे चित्र आहे. दुसरीकडे रिक्षाचालकांची मुजोरी व मनमानी यामुळे ही वाहतूक सेवा गैरसोयीची ठरत आहे. या पाश्र्वभूमीवर ठाणे पूर्व स्थानक ते घोडबंदर या मार्गावर अवैधरीत्या सुरू असलेल्या खासगी बससेवांचा आधार घ्यायला ठाणेकरांनी सुरुवात केली होती. मात्र, ठाणे वाहतूक पोलिसांनी खासगी बससेवेविरोधात कारवाईचा बडगा उगारला असून यंदाच्या वर्षांत त्यांच्याविरोधात सात हजार दोनशे विविध केसेस दाखल केल्या आहेत. या कारवाईमुळे धास्तावलेल्या खासगी बसचालकांनी अखेर ही सेवाच बंद केली आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून या मार्गावर खासगी बसगाडय़ा धावत नसल्याचे चित्र आहे. ही सेवा अचानकपणे बंद झाल्यामुळे प्रवाशांचीही तारंबळ उडाली. अखेर या मार्गावर सुरू असलेल्या टीएमटीसह बेस्ट, वसई-विरार तसेच नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमांच्या बससेवेचा प्रवाशांनी आधार घेतला आहे. ठाणेसह अन्य परिवहन उपक्रमांच्या बससेवा काही मिनिटांच्या अंतराने सातत्याने सुरू असल्याने प्रवाशांना खासगी बससेवा बंदचा फारसा फटका बसला नसल्याचे चित्र दिसून आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 16, 2015 1:36 am

Web Title: no new bus round by tmt
Next Stories
1 ठाण्यातील तलावांचा सहा महिन्यांत कायापालट
2 स्कायवॉकच्या कोपऱ्यावर पुन्हा कचरा
3 ‘पोद्दार इंटरनॅशनल’च्या कार्यालयाला टाळे
Just Now!
X