ठाण्याच्या महापौरांच्या सूचना; नियमांचे पालन करण्याचे मंडळांना आदेश

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये दरवर्षी गणेशोत्सव मंडळांच्या संख्येत होणारी वाढ थांबविणे गरजेचे असून नव्याने स्थापन झालेली अनेक मंडळांची नोंदणी केली जात नाही. केवळ गणेशोत्सवाच्या नावाखाली पावत्या फाडण्यासाठी मंडळांची स्थापना केली जाते आणि अशा मंडळांच्या मंडपांमध्ये मद्यपी बसलेले असल्याचे दिसून येतात, असा दावा ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांनी गुरवारी झालेल्या गणेशोत्सव मंडळांच्या बैठकीत केला. तसेच यापुढे नवीन मंडळांना मंडप उभारणीसाठी परवानगी देऊ नका आणि गणेशोत्सव साजरा करताना नियमांचे उल्लंघन करू नका, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

ठाणे महापालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात गुरुवारी दुपारी शहरातील गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी आणि पालिका अधिकारी यांची बैठक पार पडली. ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांनी ही बैठक आयोजित केली होती. ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये दरवर्षी नवीन गणेशोत्सव मंडळांची भर पडत असून यामुळे गणेशोत्सव मंडळांच्या संख्येत वाढ होत आहे. नव्याने स्थापन झालेली अनेक मंडळे नोंदणी करीत नाहीत. केवळ गणेशोत्सवाच्या नावाखाली पावत्या फाडण्यासाठी मंडळांची स्थापना केली जाते आणि अशा मंडळांच्या मंडपांमध्ये मद्यपी बसलेले असल्याचे दिसून येतात, असा दावा महापौर मीनाक्षी शिंदे यांनी बैठकीत केला. गणेशोत्सव मंडळांच्या संख्येत होणारी वाढ थांबविण्यासाठी यापुढे नव्याने स्थापन होणाऱ्या मंडळांना परवानगी देऊ नका, अशा सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या. मोठय़ा उंचीच्या गणेशमूर्तीचे विसर्जन वेळेत होत नाही. अनेकदा विसर्जनासाठी हाताच्या बोटावर मोजण्याइतपत कार्यकर्ते असतात. गणेशमूर्तीची मनोभावे पूजाअर्चा केली जाते. मात्र मोठय़ा उंचीच्या मूर्तीमुळे अनेकदा आपल्याकडून विटंबना होते. त्यामुळे कमी उंचीच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करा, असे आवाहनही महापौर शिंदे यांनी केले.

तर कारवाई करा..

झाडांच्या फांद्या छाटणी करताना काही जण विरोध करतात. त्यामुळे झाडांच्या फांद्या छाटल्या जात नाही. नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत असेल तर अशा झाडांच्या फांद्या छाटून दुर्घटना टाळली पाहिजे. तसेच नागरिकांच्या जीवितास धोका असेल आणि त्यानंतरही झाडांच्या फांद्या छाटण्यास विरोध केला जात असेल. न्यायालयात जाण्याची भीती दाखवत असेल तर अशा व्यक्तींवर कारवाई करण्याची भूमिका प्रशासनाने घेतली पाहिजे, असे मतही महापौर शिंदे यांनी व्यक्त केले.

खाडीवरचा भार कमी

ठाणे महापालिका क्षेत्रातील कृत्रिम तलावांमध्ये पाच फुटांपेक्षा कमी मूर्तीचे विसर्जन केले जाते. मात्र यामुळे खाडीवर विसर्जनासाठी मंडळांची मोठी गर्दी होते. ही गर्दी कमी व्हावी यासाठी आता सहा फुटांपर्यंतच्या गणेशमूर्ती कृत्रिम तलावात विसर्जनासाठी परवानगी देण्याची सूचना या वेळी करण्यात आली. ही सूचना प्रशासनाने मान्य करत त्याची यंदाच्या वर्षांपासून अंमलबजावणी करण्याची ग्वाही दिली.