प्रशासकीय अधिकारी, पोलीसही गर्दीत सामील

अंबरनाथ : समाजसेवा करत असताना सामाजिक अंतर पाळा अन्यथा छायाचित्र पाहून कारवाई केली जाईल असा उपदेश सर्वसामान्य नागरिकांना देणाऱ्या पोलिसांच्या डोळ्यादेखत मंगळवारी अंबरनाथमध्ये सामाजिक अंतराची ऐशीतैशी झालेली पाहायला मिळाली. अंबरनाथच्या पहिल्या समुदाय स्वयंपाकगृहाच्या उद्घाटनप्रसंगाचा मोठा सोहळा करण्यात आला. यात उल्हासनगर, अंबरनाथचे महत्त्वाचे महसूल अधिकारी, पोलीस अधिकारी आणि पालिका कर्मचारी गर्दीचा एक भाग बनले होते.

अंबरनाथ तालुक्यातील पहिले समुदाय स्वयंपाकगृह सुरू करण्यात आले. स्थानिक पालिका, तहसील प्रशासन आणि सामाजिक संस्थांच्या सहकार्याने गोरगरीब, अन्नधान्यापासून वंचित असलेल्या नागरिकांना याचे वाटप केले जाणार आहे. दिवसाला दोन वेळा ३ हजार जेवणाची पाकिटे वाटण्याचा हेतू आहे. मात्र या कक्षाच्या उद्घाटनप्रसंगी मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. अंबरनाथ पूर्वेतील एका सभागृहात या कक्षाची सुरुवात करण्यात आली. या वेळी उपविभागीय अधिकारी जगतसिंग गिरासे, तहसीलदार जयराज देशमुख, साहाय्यक पोलीस आयुक्त विनायक नरळे आणि पालिकेचे अधिकारी उपस्थित होते. सामाजिक संस्थांचे सदस्य तसेच राजकीय पदाधिकारी आणि कार्यकर्तेही या वेळी उपस्थित होते. मात्र या वेळी कोणत्याही प्रकारचे सामाजिक अंतर राखलेले पाहायला मिळाले नाही. त्यामुळे सामाजिक अंतराचे पालन फक्त सर्वसामान्यांनीच करायचे का, असा सवाल या कार्यक्रमाचे छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर उपस्थित केला गेला.  सामान्य नागरिकांना पोलिसांकडून कायद्याचा धाक दाखवला जातो. त्यांच्यावर गुन्हेही दाखल केले जातात मात्र या कार्यक्रमांचे काय, असा सवाल आता उपस्थित होतो आहे.