रावसाहेब दानवे यांचा दावा

मुंबई-नागपूर द्रुतगती समृद्धी महामार्गाच्या नामकरणाचा निर्णय हा सरकारचा असून त्यासाठी सरकारमधील दोन्ही पक्षाचे नेते एकत्र बैठक घेऊन निर्णय घेतील. त्यामुळे नामांतराच्या मुद्दय़ावरून दोन्ही पक्षात तणावाची परिस्थिती निर्माण होणार नाही, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे-पाटील यांनी बुधवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना केला.

तसेच शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आयोध्येचा दौरा काढून राम मंदिराचा मुद्दा हाती घेतल्यामुळे आम्ही त्याचे स्वागत करतो, असे सांगत कोणीही कुणाचा मुद्दा उचलण्याचा प्रश्न नाही. प्रत्येक जण आपल्या पक्षाचे काम करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दानवे यांनी ठाणे लोकसभा मतदार संघातील पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची ठाणे शहरात बैठक घेतली. राज्यातील २८८ विधानसभा आणि ४८ लोकसभा मतदार संघांसाठी प्रत्येकी एक विस्तारक नेमण्यात आला असून त्याच्यामार्फत कार्यकर्त्यांना एकत्र आणण्याचे काम सुरू आहे. मित्र पक्षांनी आमच्यासोबतच राहावे, अशी आमची अपेक्षा आहे.