मनसेने तिकीट दिलेल्या प्रकाश धोत्रे यांचा अर्ज तांत्रिक अडचणींमुळे अपक्ष ठरविण्यात आल्याने धोत्रे यांची घरवापसी फोल ठरली आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र पालिका निवडणुकीत भाजपने उमेदवारी नाकारल्याने धोत्रे पुन्हा मनसेत आले.
धोत्रे यांच्या पत्नी या विद्यमान नगरसेविका असून विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी आमदार किसन कथोरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन भाजपात प्रवेश केला होता. पालिका निवडणुकीत धोत्रे प्रभाग क्र. ४० मधून भाजपातर्फे निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. परंतु, भाजपाने अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारी नाकारली. शेवटी त्यांनी आदल्या दिवशी रात्री शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे संपर्क साधून उमेदवारी मागितली. पण ती जागा शिवसेनेने मुकुंद भोईर या ज्येष्ठ नेत्याला दिली असल्याने त्यांना सेनेकडून उमेदवारी मिळू शकली नाही. शेवटी अखेरच्याक्षणी धोत्रे यांनी मनसेत घरवापसी करून मनसेकडून उमेदवारी अर्ज भरला. मात्र तांत्रिक अडचणींमुळे धोत्रे यांचा अर्ज अपक्ष ठरविण्यात आला. धोत्रे हे आमचे उमेदवार असून त्यांचा अर्ज अपक्ष ठरविण्यात आला असला तरी ते आमचे पुरस्कृत उमेदवार असतील, असे मनसे शहराध्यक्ष उमेश तावडे यांनी सांगितले.

मनसे सहावर
गेल्या निवडणुकीवेळी मनसेने २६ उमेदवार रिंगणात उतरवले होते. यंदा मात्र केवळ  सहा उमेदवार असून धोत्रे अपक्ष झाले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची लोकप्रियता कमी होत असल्याने आणि लोकसभा व विधानसभा निवडणुकांवेळी त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे पक्षाला हा
फटका बसल्याचे बोलले
जात आह.

शिवसेना उमेदवार अपक्ष
बदलापूरात शिवसेनेचे प्रभाग क्र. ९ चे अधिकृत उमेदवार व ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरताना भाजप हा पक्ष निवडल्याने व एबी फॉर्म शिवसेनेचा जोडल्याने त्यांना अपक्ष घोषित करण्यात आले. परंतु अर्ज भरताना अनुभवी नगरसेवकाकडून ही चूक झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तर, भाजपने त्यांना भाजप पुरस्कृत उमेदवार म्हणून तात्काळ जाहीर केल्याने याला राजकीय वळण लागले आहे. परंतु, पाटील शिवसेनेचे पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवतील अशी शिवसेनेच्या गोटात चर्चा होत आहे. याबाबत अधिकृत मत व्यक्त करण्यास शिवसेनेकडून कोणी उपलब्ध होऊ शकले नाही.

राष्ट्रवादी काँग्रेस न्यायालयात जाणार
बदलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार ललिता जाधव, सपना मेहेर यांच्या जात पडताळणी प्रमाणपत्रावरून अडचण उपस्थित झाल्याने त्यांचे अर्ज बाद करण्यात आले, तर पल्लवी कराळे यांनी अर्जात शिक्षणाची जागा मोकळी सोडल्याने त्यांचा अर्ज बाद ठरविण्यात आला आहे. या निर्णयांविरोधात कोर्टात दाद मागणार आहे.

जात पडताळणी प्रमाणपत्र नसल्याने अर्ज बाद
जात पडताळणी प्रमाणपत्र नसल्याने काही उमेदवारांचे अर्ज बाद ठरविण्यात आले आहेत. तसेच काही उमेदवारांनी अर्जासोबत कागदपत्रे न जोडल्याने त्यांचे अर्ज बाद ठरविण्यात आले आहेत.