महापालिका क्षेत्रातील एकमेव केंद्र कल्याणमध्ये; तुटवडय़ामुळे हाल

लोकसत्ता प्रतिनिधी

डोंबिवली  सहा ते सात लाख लोकसंख्या असलेल्या डोंबिवली शहरात १८ ते ४४ वयोगटासाठी आवश्यक असलेले लस केंद्रच अस्तित्वात नसल्याने येथील रहिवाशांना लस घेण्यासाठी कल्याण शहर गाठावे लागत आहे. टाळेबंदीचे र्निबध लागू असल्याने डोंबिवलीतून कल्याणात जाण्यासाठी पोलिसांपुढे सबळ पुरावा पुढे करताना डोंबिवलीकरांच्या नाकीनऊ येत आहेत. ऑनलाइन पद्धतीने लसीकरणाची वेळ मिळत नसल्याने अनेकजण थेट कल्याणातील केंद्र गाठू लागले आहेत. त्यामुळे याठिकाणी दररोज मोठी गर्दी होत असून अंतरनियमांचे पालन होताना दिसत नाही.

डोंबिवलीतील १८ ते ४४ वयोगटातील रहिवाशाने ऑनलाइन पद्धतीने लसीकरणासाठी क्रमांक मिळविण्याचा प्रयत्न केला तर कल्याण पश्चिमेतील लालचौकी येथील आर्ट गॅलरी येथील केंद्राचे स्थळ दाखविले जाते. या केंद्रावर नोंदणी करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला जुलैपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल, असे संदेश ऑनलाइन माध्यमातून रहिवाशांना येत आहेत. पुरेशा प्रमाणात लसी उपलब्ध नसल्याने शहरात दुसरी मात्रा घेण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या अनेकांना तिष्ठत राहावे लागत आहे. अशातच १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण सुरू करण्यात आले खरे. मात्र दररोज प्रयत्न करूनही जुलै, ऑगस्टपर्यंतची प्रतिक्षायादी समोर येत असल्यामुळे नागरिक हैराण आहेत. डोंबिवलीतील काही रहिवासी ऑनलाइन नोंदणी पूर्ण होत नसल्याने कल्याणातील दोन्ही लसीकरण केंद्रांवर प्रत्यक्ष जाण्याचा प्रयत्न करतात. प्रवासाचे सबळ कारण नसल्याने या रहिवाशांना पोलिसांकडून अडविले जाते. वाहन चालकाकडे वाहनाचा कागदोपत्री पुरावा नसेल तर त्याला पुढे जाऊच दिले जात नाही. सामान्य रहिवाशांना लोकलमधून प्रवास करण्याला मुभा नाही. लसीकरण करण्यासाठी कल्याणला जायचे आहे, असे सांगून काही जण रेल्वे स्थानकात जाऊन तिकीट घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांनाही तेथे तिकीट दिले जात नाही, अशा तक्रारी रहिवाशांच्या आहेत.

डोंबिवलीतील अनेक रहिवासी पहाटे पाच वाजता कल्याण पश्चिमेतील लालचौकी येथील आर्ट गॅलरी येथील लसीकरण केंद्राबाहेर जाऊन रांगेत उभे राहत आहेत. केंद्र सुरू झाल्यानंतर ऑनलाइन नोंदणी केलेल्या रहिवाशांना प्राधान्य दिले जाते. त्यामुळे पहाटेपासून रांगेत उभे राहूनही क्रमांक येणार नसल्याने हिरमुसले होऊन रहिवासी घरी परतत आहेत. आर्ट गॅलरी येथील लसीकरण केंद्राबाहेर स्थानिक रहिवासी पहाटे चार वाजल्यापासून रांगेत उभे राहतात. त्यामुळे उशिरा जाणाऱ्या रहिवाशांना तेथील एक ते दोन किलोमीटरची रांग पाहावी लागते. अनेक रहिवासी ती रांग पाहून आपला क्रमांक दोन ते तीन तास लागणार नाही, असा विचार करून लस न घेता तेथून परतत आहेत.

डोंबिवलीकर लशीसाठी मुरबाड, शहापूरला

डोंबिवलीतील काही रहिवासी मुरबाड, शहापूर, भिवंडी परिसरातील १८ ते ४४ वयोगटासाठी देण्यात येणाऱ्या लसीकरण केंद्रांना ऑनलाइन नोंदणीत प्राधान्य देत आहेत. याठिकाणी नोंदणी पूर्ण होऊन लसीकरणाची तारीख आणि वेळ मिळाली तसेच ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रावर लसीकरणासाठी गेले की तेथे स्थानिक रहिवासी शहरी भागातून आलेल्या रहिवाशांना प्रवेश करून देत नाहीत. तुम्ही ऑनलाइन नोंदणी केली असली तरी प्रथम गावातील गावकऱ्यांचे पहिले नोंदणीकरण होईल मग तुमचा विचार करुन असे गावच्या पुढाऱ्यांकडून रहिवाशांना सांगितले जाते. शहरातून आलेल्या वाहनांना गावात थेट प्रवेश दिला जात नाही. तिथे गेल्यावरही शहरी रहिवाशांना तीन ते चार तास गावाबाहेर प्रतिक्षेत राहावे लागत आहे. काही वेळा गावात थांबूनही सर्व लस कुप्या संपल्याचे सांगून शहरी रहिवाशांना लस न घेता दीड ते दोन तासाचा प्रवास करुन पुन्हा माघारी यावे लागते. या सगळ्या प्रकारामुळे डोंबिवलीतील रहिवासी हैराण आहेत.

प्रत्येक पालिका हद्दीत १८ ते ४४ वयोगटासाठी शासनाने एकच लसीकरण केंद्र सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे कल्याण येथील आर्ट गॅलरीमध्ये हे केंद्र सुरू आहे. शासनाने केंद्र वाढविण्याची सूचना केल्यास डोंबिवलीसह इतर भागांत केंद्र वाढविण्यात येतील. सध्या लशीचा मुबलक पुरवठा होत नसल्याने वाढीव लस केंद्रांवर र्निबध आहेत.

– डॉ. अश्विनी पाटील, वैद्यकीय आरोग्य अधिकारी