एमआयडीसीतील कंपन्यांच्या सांडपाणी प्रक्रियेवर अद्याप तोडगा नाही; मालक, व्यवस्थापन कंपन्या बंद करण्याच्या विचारात

अंबरनाथमधील एमआयडीसी परिसरातील कंपन्यांमधील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प योग्यरित्या कार्यान्वित करण्याबाबत तीन महिन्यांपासून कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे या कंपन्यांमधील जवळपास २० हजार कामगारांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.

कल्याण, अंबरनाथ येथील एमआयडीसी परिसरातील कंपन्यांकडून सांडपाणी प्रRि या प्रकल्प योग्यरित्या राबविला जात नसल्याने मोठय़ा प्रमाणावर प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे आल्याने हरित लवादाने प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कान उपटले. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने कल्याण आणि अंबरनाथमधील शेकडो कंपन्यांना काम बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

कल्याण आणि अंबरनाथ एमआयडीसीतील कंपन्यांकडून मोठय़ा प्रमाणावर प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी अनेक वर्षांपासून पुढे येत आहेत. या तक्रारींकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने वनशक्तीसारख्या संस्थांनी याप्रकरणी हरित लवादाकडे धाव घेतली. हरित लवादाच्या आदेशामुळे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनीही या प्रकरणाची दखल घेत सांडपाणी प्रक्रिया केंद्र प्रकरणी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा असे आदेश दिले होते. दरम्यान, प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून उद्योगांना मुदत दिली जावी यासंबंधी स्थानिक राजकीय नेत्यांसोबत काही उद्योजकांनी मध्यंतरी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. या भेटीत तोडगा काढण्यासंबंधी विविध पर्यायांवर चर्चा करण्यात आली.

मात्र, तीन महिने उलटूनही याप्रकरणी काहीच कार्यवाही झाली नसल्याने अद्याप ६६ कंपन्यांतील काम सुरू होऊ शकलेले नाही. यापैकी काही कंपन्या काम बंद असले तरी कामगारांना वेतन देण्यात येत आहेत. मात्र, येत्या ऑक्टोबपर्यंत याप्रकरणी काहीही कारवाई झाली नाही तर या कंपन्या कायमच्या बंद करण्यात येतील, असा इशारा आता कंपनी मालक देऊ लागले आहेत. हरित लवाद आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारवाईतून मध्यम तोडगा निघाला नाही तर कंपनी मालकांना आर्थिकदृष्टय़ा परवडणारे नाही. त्यामुळे आर्थिक नुकसान सोसण्यापेक्षा कंपन्या बंद केलेल्या बऱ्या अशा मानसिकतेत आता कंपनी मालक आले असून यामुळे जवळपास २० हजार कामगारांवर बेरोजगारीची टांगती तलवार कायम आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून आर्थिक नुकसान सोसून कंपन्या कामगारांना पगार देत आहेत. मात्र ७६ पैकी ६६ कंपन्या १ ऑक्टोबरपासून काम पूर्णपणे बंद करण्याच्या मन:स्थितीत आहेत. त्यामुळे कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. याप्रकरणी राज्य सरकारने तातडीने तोडगा काढण्याची आवश्यकता आहे.

उमेश तायडे, आमा संघटना.