News Flash

कातकरी पाडा तहानला

वसई-विरार महानगरपालिका पुरेशा पाणीसाठा असल्याचा दावा करत आहे, तर दुसरीकडे शहरातील अनेक भागांत नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत.

विरार पूर्वेच्या चंदनसार भाग, कातकरी पाडा आणि जीवदानी पायथ्याशी असलेल्या झोपडपट्टी भागात पाच दिवसांआड पाणी येत असल्याने नागरिकांना टँकरची वाट बघावी लागत आहे.

कृत्रिम टंचाईचा आरोप; पाच दिवसांआड पाणी येत असल्याने टँकरवाल्यांचे उखळ पांढरे

लोकसत्ता प्रतिनिधी

विरार : वसई-विरार महानगरपालिका पुरेशा पाणीसाठा असल्याचा दावा करत आहे, तर दुसरीकडे शहरातील अनेक भागांत नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. त्यात विरार पूर्वेच्या चंदनसार परिसरातील कातकरी पाडय़ात मागील काही महिन्यांपासून पाच दिवसांआड पाणी मिळत असल्याने पाणीसमस्या अधिक गंभीर बनत चालली आहे.

विरार पूर्वेच्या चंदनसार भाग, कातकरी पाडा आणि जीवदानी पायथ्याशी असलेल्या झोपडपट्टी भागात पाच दिवसांआड पाणी येत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. परिणामी या रहिवाशांना विकतच्या पाण्यावर आपली तहान भागवावी लागत आहे. मागील काही महिन्यांपासून विरार पूर्व पट्टीत मोठय़ा प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तब्बल ४- ५ दिवसांनी पाणी येत असल्याने नागरिकांना टँकर  व पाणी व्यावसायिकांकडून पाणी विकत घ्यावे लागत आहे. यासाठी मोठय़ा प्रमाणात नागरिकांना पैसे मोजावे लागत आहेत.

ही पाणीटंचाई कृत्रिम असल्याचा आरोप नागरिक आता करत आहेत, कारण महापालिका पुरेशा पाणीसाठा असल्याचा दावा करत आहे. असे असतानाही या परिसरात पाणी का येत नाही? मार्च महिन्यातच नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत असेल, तर पुढचे दिवस काढायचे कसे? असा प्रश्न येथील नागरिक पालिकेला विचारत आहेत.

या परिसरात पालिकेने आधी मोठय़ा प्रमाणत सार्वजनिक नळजोडण्या दिल्या होत्या, परंतु कालांतराने त्या बंद करण्यात आल्या. यामुळे काही ठरावीक नळावर नागरिकांना रांगा लावाव्या लागतात. यात अनेक वेळा भांडणे होतात. येथील रहिवासी विकास भालावे यांनी माहिती दिली की, चार ते पाच  दिवसांआड पाणी येत असल्याने आम्हाला ज्या दिवशी पाणी येणार त्या दिवशी घरी राहून अतिरिक्त पाणी भरावे लागते. अन्यथा, विकतचे पाणी आणावे लागते. तर काही जण रस्त्यावर उभ्या असलेल्या टँकरमधून पाणी भरून आणत आहेत. इतकी पाणीटंचाई असतानाही पालिका दखल घेत नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2021 2:19 am

Web Title: no water at katkaripada dd 70
Next Stories
1 करोना कराल : पालिका पास की नापास? वसई-विरार पालिका – अवघ्या १९ कोटींत चार हात
2 कल्याण-डोंबिवलीत कठोर निर्बंध
3 ठाणे जिल्ह््यातील ग्रामीण भागात शाळा १५ मार्चपासून बंद
Just Now!
X