मुंबई, ठाणे तसेच आसपासच्या शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या जिल्ह्य़ातील धरणांमध्ये १५ दिवसांपूर्वी सुमारे ६० टक्क्यांच्या आसपास पाणीसाठा शिल्लक होता. गेल्या १५ दिवसांपासून पावसाचा जोर पुन्हा कमी झाल्याने ठाणे तसेच आसपासच्या शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठय़ात फारशी वाढ झालेली नाही. बारवी धरणाच्या पाणीसाठय़ात जेमतेम चार टक्क्यांची वाढ झाली आहे. ऑगस्ट महिना उजाडूनही या धरणातील पाणीसाठय़ाची पातळी ७० टक्क्यांपर्यंतही पोहचलेली नाही. त्यामुळे पाटबंधारे विभागाने ठाण्यासह सर्वच महापालिकांना दक्षतेचा इशारा दिला असून, येत्या काही दिवसात पाणीकपातीचा फेरआढावा घेतला जाण्याची चिन्हे आहेत.
ठाणे जिल्ह्य़ातील वेगवेगळ्या धरणांमधून मुंबई, ठाणे तसेच आसपासच्या शहरांना पाणीपुरवठा करण्यात येतो. या धरण क्षेत्रात जून आणि जुलै या दोन महिन्यांत पुरेसा पाऊस न झाल्याने पाणीसाठय़ात अपेक्षित वाढ होऊ शकलेली नाही. गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर पुन्हा कमी झाला असून, धरण क्षेत्रातही समाधानकारक पाऊस झालेला नाही. विशेष म्हणजे १५ दिवसांपूर्वीची आकडेवारी पाहता भातसा धरणातील पातळी घटल्याचे दिसून येते. तसेच उर्वरित बारवी आणि तानसा धरणांच्या पातळीत चार ते पाच टक्क्यांनी वाढ, तर मोडकसागर धरणातील पातळी जैसे थे स्थिती असल्याचे दिसून येते.
गेल्या २४ तासांत धरण क्षेत्रात जेमतेम ५.२९ मि.मी. पाऊस झाला असून गेल्या काही दिवसांपासून पावसाची स्थिती अशीच आहे. त्यामुळे जिल्ह्य़ातील धरणांच्या पातळीत धीम्या गतीने वाढ होत आहे. दरम्यान या धरणातील पाणीसाठय़ांचे नियोजन करण्यासाठी ठाण्यासह आसपासच्या शहरात आधीच आठवडय़ातून दोन दिवस पाणीकपात करण्यात आली आहे. असे असतानाच ऑगस्ट महिना उजाडूनही धरणातील पाणीसाठय़ामध्ये अपेक्षित वाढ होऊ शकली नसल्यामुळे, पाणी नियोजनाचा नवा आराखडा येत्या काही दिवसांत आखला जाण्याची शक्यता पाटबंधारे विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ठाणे लोकसत्ताशी बोलताना व्यक्त केली. संबंधित महापालिकांना यासंबंधीच्या सूचना देण्यात आल्या असून धरणातील पाणीसाठय़ाची कल्पनाही देण्यात आली आहे, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
धरणांतील पाणीसाठय़ाची स्थिती
धरण १५ दिवसांपूर्वी १५ दिवसांत
बारवी ४८.१५ टक्के ५२ टक्के
भातसा ६६.७३ टक्के ६६.८३ टक्के
मोडकसागर ९०.६२ टक्के ९०.७२ टक्के
तानसा ६३.३४ टक्के ६८.३६ टक्के
ठाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणात सध्या ५२ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 14, 2015 2:28 am