ठाणे : जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामामुळे शुक्रवारी ठाणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच या बंदमुळे पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याने ठाणेकरांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. ठाणे शहरामध्ये दररोज ४८५ दशलक्षलिटर इतका पाणीपुरवठा महापालिकेकडून करण्यात येतो. त्यापैकी महापालिका योजनेतून २०० तर स्टेम प्राधिकरणाकडून ११० असा एकूण ३१० दशलक्षलिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. पालिका आणि स्टेम प्राधिकरणाकडून मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम शुक्रवारी हाती घेण्यात येणार असल्याने या योजनेतून होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे शुक्रवार, १० जानेवारी रोजी सकाळी ९ ते शनिवार, ११ जानेवारी रोजी सकाळी ९ या कालावधीत शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.