दिव्याखाली अंधार या उक्तीप्रमाणेच धरण परिसरात पाण्याचे दुर्भिक्ष्य या वास्तवाचा दाहक अनुभव वाडा तालुक्यातील तानसा धरणाजवळील जवळपास ३६ गावांमधील ४० हजार लोकवस्ती सध्या घेत आहे. या भागातील अनेक गाव-पाडय़ांमध्ये शुद्ध पाणी पुरवठय़ाची कोणतीही योजना अद्याप अस्तित्वातच आलेली नाही. त्यामुळे आता भर पावसाळ्यातही ओढय़ा-नाल्यांमध्ये खड्डा खणून त्यात साचणारे पाणी येथील रहिवाशांना प्यावे लागत आहे.कुडूसपासून ११ किलोमीटर, वाडय़ापासून १५ किलोमीटर तर वासिंदपासून १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या या परिसरातील अनेक गावांना अद्याप वीजपुरवठा होऊ शकलेला नाही. या भागातील रस्त्यांची कमालीची दुरवस्था असून पावसाळ्यात त्यातून वाट काढणे अतिशय मुश्कील होते. बहुतांश आदिवासी समाज असलेल्या या भागात शासकीय यंत्रणेचा मागमूसही दिसत नाही. पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून रस्त्याचे काम सुरू असल्याचा फक्त फलक दिसतो. मात्र अद्याप प्रत्यक्षात कामाचा कोणताही पत्ता नाही. वाडय़ातील ग्रामीण रुग्णालयाचा अपवाद वगळता या भागात कोणतीही आरोग्य सुविधा नाही. खराब रस्त्यांमुळे भिवंडी आगरातून होणारी बससेवा बंद झाली आहे. खैरे आंबिवली ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणारे हडलपाडा, भुयारपाडा, सावरोली, चंदोली आदी अनेक पाडय़ांपर्यंत अद्याप पाणी आणि वीज या प्राथमिक सुविधाही पोहोचू शकलेल्या नाहीत. गेली अनेक वर्षे या प्राथमिक सुविधांसाठी स्थानिक रहिवासी जिल्हा प्रशासन तसेच शासनदरबारी पाठपुरावा करीत आहे. मात्र लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे त्यांची ससेहोलपट सुरू आहे.

चार आमदार.. तरीही दुर्लक्षित
वाडा या एकाच तालुक्यात ही गावे असली तरी ती शहापूर, भिवंडी (ग्रामीण), विक्रमगड आणि वाडा या चार विधानसभा मतदार संघांमध्ये विभागली गेली आहेत. अशा प्रकारे चार आमदार असूनही हा विभाग प्राथमिक सुविधांपासून अद्याप वंचित राहिला आहे. गेल्या वर्षी नव्याने निर्माण झालेल्या पालघर जिल्ह्य़ानंतरही या परिसराकडे शासनाचे दुर्लक्ष मागच्या पानावरून पुढे सुरूच आहे. प्रशासनाने जणू काही वर्षांनुवर्षे या परिसरावर बहिष्कार टाकला असल्याची प्रतिक्रिया स्थानिक रहिवासी अरविंद भानुशाली यांनी व्यक्त केली.

विद्यार्थ्यांना सौर कंदिलांचा आधार
शासन आणि प्रशासनाने दुर्लक्ष केले असले तरी अनेक स्वयंसेवी संस्था या भागात विविध लोकोपयोगी कामे करीत आहेत. खैरे आंबिवली गावातील ग्रामस्थ पी.ए. देशमुख यांनी दिलेल्या जागेत असलेले श्रीमती सुरेखा एच. गार्डी स्वजन विद्यालय हे या भागातील एकमेव माध्यमिक विद्यालय आहे. आजूबाजूच्या पाडय़ांमधील ५२० आदिवासी विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांना घरी अभ्यास करणे सोपे जावे म्हणून अ‍ॅरिसमीडिया या कंपनीच्या वतीने सौर कंदील देण्यात आले.