नोकरदार महिलांची मात्र गैरसोय
अपुरा असलेला जलसाठा जुलैच्या मध्यापर्यंत पुरावा म्हणून शनिवार आणि रविवार सलग दोन दिवस जिल्ह्य़ातील सर्व ठिकाणी असलेला पाणी पुरवठा बंद ठेवण्याच्या निर्णयावर सर्वसामान्य नागरिक नाराज आहेत. बहुतेक नोकरदार आठवडय़ातील पाच दिवस दिवसभर नोकरीनिमित्त घराबाहेर असतात. त्यामुळे आठवडाभरातील कामे या दोन दिवशी केली जातात. विशेषत: नोकरदार महिला वर्ग रविवारी कपडे धुणे, स्वच्छता आदी कामे करीत असतात. आता नेमक्या सुट्टीच्या दिवशीच पाणी येणार नसल्याने त्यांची पंचाईत होणार आहे.
यासंदर्भात पाणीपुरवठा विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी सर्वाधिक पाणी उपसा होतो. त्यामुळे या पाण्याच्या उधळपट्टीवर बंधन यावे, या उद्देशाने शनिवार-रविवारी पाणी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
कल्याण डोंबिवली शहरांचा पाणीपुरवठा नवीन नियोजनाप्रमाणे शनिवारी आणि रविवारी बंद ठेवण्यात येणार आहे. शुक्रवारी रात्री १२ वाजता बंद होणारा पाणीपुरवठा रविवारी रात्री १२ वाजता सुरू होणार असल्याचे पालिकेने जाहीर केले आहे. दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने या काळात पाण्याचे टँकरही उपलब्ध करून देण्यात येणार नाहीत, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
बारवी, आंदर या धरणांतून कल्याण डोंबिवली शहरांना पाणीपुरवठा केला जातो. उल्हास नदीतून हे पाणी पालिके उचलते. ते मोहिली आणि बारावे येथे शुद्धीकरण करून मग शहरांना वितरित केले जाते. गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने धरणात पुरेसा पाणी साठा झालेला नाही. धरणातील उपलब्ध पाणी जुलैपर्यंत पुरले पाहिजे, या विचारातून पाटबंधारे विभागाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, मंडळांना तीस टक्के पाणी कपात लागू केली आहे. उष्णतामान जसे वाढेल त्या प्रमाणात धरणातील पाण्याचे बाष्पीभवनाची प्रक्रिया वेगाने होऊन पाणी साठय़ात आणखी घट होण्याची शक्यता विचारात घेऊन, लगोपाठ दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे. यापूर्वी कल्याण डोंबिवलीचा पाणीपुरवठा मंगळवार आणि शनिवारी बंद ठेवण्यात होता. मंगळवारऐवजी आता रविवारी हा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.