रुग्णालय, पोलीस ठाणे परिसरातही ६० ते ९५ डेसिबल आवाजाची नोंद

नवरात्रोत्सवातील विसर्जन मिरवणुकांदरम्यान शहरातील विविध भागात घरगुतीसह सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांकडून आवाजाची पातळी ओलांडण्यात आल्याचे चित्र मंगळवारी पाहायला मिळाले. रुग्णालय परिसरासह पोलीस ठाण्यांच्या आवारातही मिरवणुकांनी ६० ते ९५ डेसिबल आवाजाची पातळी गाठल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांनी घेतलेल्या नोंदीतून समोर आले आहे.

ठाणे शहरात मंगळवारी १० हजार ७५४ नवरात्रोत्सव देवींचे विसर्जन झाले. यामध्ये २८१ घरगुती, १ हजार ७२८ सार्वजनिक, ८ हजार ७३७ घटांचे आणि ८ गणेशमूर्तीचे विसर्जन झाले. एकूण १६ तलावांमध्ये या मूर्त्यांचे विसर्जन झाले. विसर्जनावेळी नागरिकांकडून काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान ध्वनिक्षेपक, बँजो, ढोल-ताशे यांचा मोठय़ा प्रमाणावर समावेश असल्याने विसर्जनाच्या वाटेवर आवाजाची पातळी ओलांडण्यात आल्याचे पाहायला मिळाले. महिनाभरापूर्वी गणेशोत्सवादरम्यान देखील विसर्जन मिरवणुकांवेळी शहरातील गोखले मार्ग, राम मारुती मार्ग, स्थानक परिसर, वर्तकनगर, घोडबंदर, वागळे इस्टेट या भागांमध्ये मोठय़ा प्रमाणावर मिरवणुकीतील ध्वनिक्षेपक, बँजो, ढोल-ताशे यांच्या आवाजाने ९० ते ११० इतकी पातळी गाठली होती.

नवरात्रोत्सवातील मिरवणुकींमध्येही हेच ध्वनिप्रदूषणाचे चित्र कायम राहिले. काही दिवसांपूर्वी ठाणे महापालिकेकडून शहरातील रुग्णालये, पोलीस स्थानक परिसरामध्ये ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी आवाजाची मर्यादा नेमून देण्यात आली होती. मंगळवारी देवी विसर्जन मिरवणुकांदरम्यान या भागात मोठा गोंगाट झाल्याचे पाहायला मिळत आहे.

गोखले मार्गावरील देवधर रुग्णालय परिसरात ८५ ते ९० डेसिबल आवाजाची नोंद करण्यात आली. तर वर्तकनगर येथील पोलीस स्थानक परिसरात ६० डेसिबल आवाजाची नोंद करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे नियमावलीचे आदेश काढणाऱ्या ठाणे महापालिका मुख्यालयाच्या परिसरामध्ये ८० ते ८५ डेसिबल आवाजाची नोंद करण्यात आली आहे.

  • ठिकाण                    आवाज पातळी
  •                               (डेसिबलमध्ये)
  • राम मारुती रोड       ९०-९५
  • राम मारुती कॉर्नर     ९५-१००
  • गोखले मार्ग             ९०-९५
  • वर्तकनगर               ९०-९५
  • शिवाईनगर             ९५

देवी विसर्जन मिरवणुकांवेळी ध्वनिक्षेपके, बँजो, ढोल-ताशे यांच्याद्वारे येणाऱ्या मोठय़ा आवाजामुळे गोंगाट कायम होता. राम मारुती मार्गावर रात्री १० वाजता १०५ डेसिबल आवाजाची नोंद करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे पोलिसांकडून आवाजाच्या नोंदी होत नसल्याचे दिसून आले.

-डॉ. महेश बेडेकर, सामाजिक कार्यकर्ते