पाच दिवसांच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनिमर्यादेचे उल्लंघन

रस्ता व्यापून उभारलेले मंडप, फलकबाजी यासोबत होणाऱ्या ध्वनिवर्धकांच्या दणदणाटावरून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना धारेवर धरले जात असताना ठाणे शहरातील घरगुती गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीनेही गोंगाटाची पातळी ओलांडल्याचे उघड झाले आहे. पाच दिवसांच्या गणेश विसर्जन मिरवणुकीतील ढोलताशे आणि डीजेंच्या दणदणाटामुळे शांतता क्षेत्रातही ध्वनीची पातळी १०० डेसिबलपेक्षा जास्त गेल्याने शहरात ध्वनिप्रदूषण झाल्याचे तपासाअंती सिद्ध झाले आहे. त्यामुळे ध्वनिप्रदूषणाची मर्यादा आणि नियमांची पायमल्ली करण्यात सर्वसामान्य ठाणेकरही मागे नसल्याचे स्पष्ट होत आहे.
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शाडूच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करणे, कृत्रिम तलावात विसर्जन करणे अशा उपक्रमांमध्ये नागरिक हिरिरीने सहभागी होत असताना हे सामाजिक भान ध्वनिप्रदूषण करताना मात्र नाहीसे होत आहे. घरातील गणपतीला पाच दिवसांनी निरोप देतानादेखील अनेकजण ढोलताशे आणि बॅण्डपथकांना ‘सुपारी’ देत असल्याने दिसून आले.
उत्सवात होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाची नोंद ठेवणारे ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते डॉ. महेश बेडेकर यांनी यंदा केलेल्या नोंदीनुसार, पाचव्या दिवशी झालेल्या विसर्जन मिरवणुकींमध्येही आवाजाने प्रदूषणाची पातळी ओलांडल्याचे दिसून आले. शांतताक्षेत्र म्हणून घोषित असलेल्या रुग्णालयांच्या परिसरातही आवाजावर नियंत्रण नसल्याचे त्यांना दिसून आले. मात्र, याकडे पोलीस आणि प्रशासनाने साफ दुर्लक्ष केले. काही ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यांमध्ये दूरध्वनी करून तक्रारी दाखल करण्याचा प्रयत्नही केला. मात्र, त्या तक्रारींची अजिबात दखल घेतली गेली नाही, असे बेडेकर म्हणाले.

पाचव्या दिवशीचा दणदणाट

वेळ स्थळ आवाजाची पातळी
सायं. ५.३० पाचपाखाडी ७५-८०
रात्री १० पाचपाखाडी ८५-९०
रात्री ९.३० राम मारुती रोड ८५
रात्री ९.४० गोखले रोड ९०-९५
रात्री ९.४५ गोखले रोड ९५-१००
(रुग्णालय परिसर)
रात्री ९.५० मल्हार सिनेमा ८५-९०
रात्री १०.१० खोपट (एसटी कार्यशाळा) ९५-१००
रात्री १०.१५ खोपट ९०
रात्री १०.३० वर्तकनगर ९०-९५
रात्री १०.४५ समता नगर ९५-१००
रात्री ११ चरई ९०-९५
रात्री ११.५ तलावपाळी ९०-९५