रस्ते व चौकातील सभांनाही पोलिसांची बंदी

निवडणूक काळात रिक्षा तसेच इतर वाहनांना भोंगे लावून सकाळपासून अगदी रात्री दहाच्या ठोक्यापर्यंत शहरभर पक्ष किंवा उमेदवाराच्या प्रचारार्थ गोंगाट करत फिरणाऱ्या वाहनांवर बंदी घालण्याचा निर्णय भिवंडी पोलिसांनी घेतला आहे. येत्या २४ मे रोजी भिवंडी महापालिकेची निवडणूक होत असून येथील वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेता पोलिसांनी रस्ते तसेच चौक अडवून घेण्यात येणाऱ्या राजकीय पक्षांच्या प्रचारसभांनाही परवानगी नाकारण्याचे ठरविले आहे. तसेच वाहनांचा ताफा घेऊन काढण्यात येणाऱ्या प्रचारफे ऱ्यांना परवानगी दिली जाणार नाही, अशी माहिती पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. या  निर्णयांमुळे शहरातील ध्वनिप्रदूषण रोखण्यास आणि संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यास मदत होणार आहे.

निवडणूक काळात मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवार विविध प्रकारची रणनीती आखत असतात. त्याचाच एक भाग म्हणून रिक्षा तसेच अन्य वाहनांवर भोंगे लावून गल्लोगल्ली फिरविले जातात. अशा वाहनांमधून उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत असतात. अशा वाहनांद्वारे अखंड सुरू राहणाऱ्या गोंगाटामुळे ध्वनिप्रदूषणात भर पडत असते. तसेच शहरातील शांतता क्षेत्रातूनही या वाहनांची रपेट अव्याहतपणे सुरू असते. नेमकी ही बाब लक्षात घेऊन भिवंडी पोलिसांनी अशा वाहनफेऱ्यांना पायबंद घालण्याचा निर्णय घेतला आहे. भिवंडी महापालिका निवडणूक काळात भोंगे लावून प्रचार करणाऱ्या वाहनांना कोणतीही परवानगी दिली जाणार नसल्याची माहिती भिवंडीचे पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली. ही प्रचारवाहने संपूर्ण शहरात फिरत असतात आणि त्यांच्याकडून शांतता क्षेत्रामध्येही ध्वनिप्रदूषण होण्याची शक्यता असते. त्यामुळे या वाहनांकडून शहरात ध्वनिप्रदूषण होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भिवंडी महापालिका क्षेत्रातील अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. निवडणूक काळात याच रस्त्यांवर राजकीय पक्षांकडून जाहीर सभा घेतल्या जातात. या सभांमुळे या भागातील कोंडीत भर पडते. त्यामुळे भिवंडीतील वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेऊन रस्ते व चौक अडवून होणाऱ्या राजकीय पक्षांच्या सभांना परवानगी द्यायची नाही, असा निर्णय पोलिसांनी घेतला आहे.

आधार क्रमांक मतदार यादीशी जोडावा!

भिवंडी-निजामपूर पालिकेच्या निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर मतदार याद्यांमध्ये दोनवेळा नावे असल्याचा वा बनावट नावे समाविष्ट केल्याचा केलेला आरोप या सगळ्यांची उच्च न्यायालयाने बुधवारी गंभीर दखल घेतली. एवढेच नव्हे, तर या घोळाला आळा घालण्याच्या दृष्टीने निवडणूक आयोगाला न्यायालयाने महत्त्वपूर्ण सूचना केल्या असून त्यात त्यात मतदार यादीचे काम वर्षभर सुरू ठेवावे, वर्षांतून दोनवेळा मतदार याद्यांची पडताळणी करून त्यातील त्रुटी दूर करावी आणि महत्त्वाचे म्हणजे शक्य असेल तर प्रत्येक मतदाराचा ‘आधार’ क्रमांक मतदार यादीशी जोडण्यात यावा, अशा सूचना न्यायालयाने केल्या आहेत.  भिवंडी-निजामपूर पालिकेच्या निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर मतदार यांद्यातील घोळाबाबत दाखल करण्यात आलेल्या विविध याचिका निकाली काढल्या.