कुळगांव-बदलापूर आणि अंबरनाथ नगरपालिकांमध्ये स्वीकृत सदस्य आणि विषय समित्यांच्या निवडणुका येत्या २५ तारखेला होऊ घातल्या आहेत. यासाठी शिवसेना, भाजपसह प्रमुख पक्षातील पडेल उमेदवार आणि तिकीट न मिळालेल्या इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यापैकी काही आतापासूनच शहरातील राजकीय नेत्यांकडे उंबरठे झिजवत असून, काही पत्रकारही या स्पर्धेत उतरल्याचे चित्र आहे.
बदलापूर आणि अंबरनाथ नगरपालिकेत विषय समित्या तसेच स्वीकृत सदस्यांच्या निवडणुका येत्या २५ मे रोजी दुपारी ३ वाजता होणार आहेत, असे ठाण्याच्या जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी जाहीर केले आहे. यासाठी बदलापूर पालिकेत कल्याणचे उपविभागीय अधिकारी डॉ. धनंजय सावळस्कर, तर अंबरनाथ पालिकेत उल्हासनगरचे उपविभागीय अधिकारी बी. जी. गावंडे हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कारभार पाहणार आहेत. त्यामुळे सध्या दोन्ही शहरांतील कार्यकर्त्यांनी आपली या पदावर वर्णी लागावी यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
अंबरनाथ आणि बदलापूर अशा दोन्ही ठिकाणी शिवसेनेने एकहाती सत्ता प्रस्थापित केल्याने विषय समित्यांची सभापतीपदे इतरांना देण्याचा प्रश्नच येत नाही, असे मत ज्येष्ठ नेत्याने ‘ठाणे लोकसत्ता’कडे व्यक्त केले.
बदलापुरात शिवसेनेचे २४ नगरसेवक असून त्यांना एका अपक्ष नगरसेवकाची साथ आहे, तर भाजपकडे २० नगरसेवक आहेत. अन्य पक्षांचे एवढे संख्याबळ नसल्याने शिवसेनेला तीन, तर भाजपला एक स्वीकृत सदस्य करता येणे शक्य आहे. अंबरनाथमध्ये शिवसेनेचे २५, तसेच ६ अपक्ष, भाजपचे १० व काँग्रेसकडे ८ नगरसेवक आहेत.
त्यामुळे शिवसेनेला तीन, तर भाजप व काँग्रेसला प्रत्येकी एक-एक नगरसेवक स्वीकृत सदस्यपदी निवडता येणार आहे. त्यामुळे दोन्ही पालिकांमध्ये पाच-पाच स्वीकृत सदस्य बसणार आहेत.

शासन निर्णयाचे काय?
२०१२ साली शासनाने काढलेल्या अध्यादेशान्वये स्वीकृत सदस्यांची पात्रता पाहणे अनिवार्य आहे. यानुसार माजी मुख्याधिकारी, पालिकेचा सहाय्यक आयुक्त, उपायुक्त, सनदी लेखापाल आदी पदांचा पाच वर्षांपेक्षा जास्त अनुभव असेलली व्यक्ती वा डॉक्टर, वकील, मुख्याध्यापक, अधिव्याख्याता, निवृत्त प्राध्यापक, मान्यताप्राप्त विद्यापीठातील अभियंता, तसेच सामाजिक क्षेत्रात पाच वर्षांचा अनुभव असलेली व्यक्ती हे स्वीकृत सदस्य होण्यासाठी पात्र आहेत. परंतु, सध्या राजकीय पक्षांचे इच्छुक उमेदवार पाहता हा अध्यादेश धाब्यावर बसवणार अशीच चिन्हे दिसत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.