भगवान मंडलिक

डोंबिवलीत राखीव भूखंड, सरकारी जमिनी हडपण्यासाठी माफियांमध्ये चढाओढ

डोंबिवली पश्चिमेत ‘ह’ प्रभागात ३५ इमारतींची बांधकामे सुरू आहेत. यातील ११ इमारतींना नगररचना विभागाने परवानगी दिली आहे. तर उर्वरित २४ इमारती विनापरवाना  बांधल्या जात आहेत. पालिकेचे सुविधा भूखंड, गावठाण, सरकारी जमिनींवर बांधण्यात येत आहेत. या बांधकामांसाठी पालिकेच्या जलवाहिन्यांमधून पाणी वापरले जात आहे. सहा ते सात माळ्याच्या बेकायदा इमारतींना नगररचना विभागाच्या परवानग्या घेतल्या नाहीत.

सर्वाधिक बेकायदा बांधकामे कुंभारखाणपाडा, नवापाडा, गरीबाचापाडा, देवीचापाडा भागात सुरू आहेत. जुनी डोंबिवली, मोठागाव, रेतीबंदर खाडी, देवीचापाडा खाडी किनारी बेकायदा चाळी बांधण्याची कामे सुरू आहेत. या भागांतील पालिकेच्या बगिचा, उद्यान, महावितरण प्रयोजनासाठी आरक्षित भूखंडावर इमारती उभारण्याची कामे सुरू आहेत. गरीबाचापाडा जलकुंभाच्या समोरील भागात मुख्य रस्त्यावर एका इमारतीच्या सामासिक अंतरामध्ये गाळे उभारणीसाठी बांधकाम सुरू केले आहे. दहशतीचा अवलंब करून हे बेकायदा बांधकाम सुरू असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. जुन्या चाळी, कौलारू घरे तोडून इमारत बांधकामाचे सर्व नियम पायदळी तुडवून बेकायदा बांधकामे सुरू आहेत.

या बांधकामांसाठी रेती ऐवजी सिमेंटमध्ये क्रश (दगडाची भुकटी) वापरली जाते. पाच ते सहा माळ्याची एक इमारत एक ते दीड महिन्यात पूर्ण केली जात आहे. भरत भोईर नाल्याला खेटून सामासिक अंतर न सोडता बेकायदा इमारती उभारणीची कामे सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. इमारत बांधून पूर्ण झाली की तात्काळ रंगरंगोटी करून तेथे पालिकेने कारवाई करून नये म्हणून कुटुंबीयांना राहण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जाते. बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश आयुक्त गोविंद बोडके यांनी दिले आहेत.

डोंबिवली पश्चिमेत वर्षभरात विकासकांना ११ बांधकाम परवानग्या दिल्या आहेत. या व्यतिरिक्त पश्चिमेत बांधकामे सुरू असतील तर

त्यांनी नगररचना विभागातून परवानग्या घेतल्या नाहीत.

– सुरेंद्र टेंगळे, नगररचनाकार

‘ह’ प्रभागाच्या हद्दीत बांधकामे सुरू आहेत. अशा बांधकामांचे सर्वेक्षण सुरू आहे. बेकायदा बांधकामाची यादी अतिक्रमण नियंत्रण विभागाला देऊन कारवाईची मागणी करण्यात येणार आहे.

अरूण वानखेडे, प्रभाग अधिकारी