चिकन, मटण, मासे, खेकडे, शिंपले.. मांसाहारी पदार्थावर ताव मारायला ज्यांना आवडते, त्यांच्यासाठी हा ‘खाद्य’नजराणा सादर केला तर ते अगदी त्यावर तुटून पडतील आणि समाधानाचा ढेकर देतील. अशाच खवय्यांचे समाधान करण्यासाठी वसई स्थानकाजवळ असलेले ‘हॉटेल समाधान’ हे उत्तम ठिकाण आहे. या उपाहारगृहात मालवणी, इंडियन, चायनिज अशा विविध प्रकारांतील डिश मिळतात. मालवणी स्वादातील अतिशय उत्तम असे पदार्थ येथे चाखण्यास मिळतात.

वसईत राहणारे मात्र मूळ कोकणातील अविनाश कुशे यांच्या आजोबांनी १९६८ मध्ये वसई रेल्वे स्थानक परिसरात हे उपाहारगृह उभे केले. त्यानंतर अविनाश यांच्या वडिलांनी उपाहारगृहाचा कारभार सांभाळला आणि आता तीच परंपरा अविनाश पुढे चालवत आहेत. सुरुवातीला मोजक्याच डिश या उपाहारगृहात होत्या. मात्र आता विविध प्रकारच्या आणि विविध स्वादाच्या अनेक डिश येथे मिळतात.

‘हॉटेल समाधान’मधील खेकडा मसाला ही खवय्यांची आवडती डिश. मोरी मसाला, शिंपल्या मसाला हे मालवणी पदार्थही येथे प्रसिद्ध. खास मालवणी पद्धतीने हे तीनही पदार्थ बनवण्यात येतात. तेलावर फोडणी दिली का त्यानंतर सुके खोबरे भाजून त्याचे वाटण, आले-लसूणची पेस्ट, त्यानंतर खेकडे अशा मिश्रणातून खेकडा मसाला तयार करण्यात येतो. त्यानंतर शिंपल्या मसाला आणि मोरी मसाला या डिश बनवण्याची पद्धतीही सारखीच आहे, मात्र त्यात आले-लसूनची पेस्ट आणि इतर पदार्थ यांचे प्रमाण कमी-जास्त केलेले असते. अगदी अस्सल मालवणी पद्धतीने झणझणीत असा या तीनही पदार्थाचा रस्सा चाखण्यासाठी खवय्ये खास ‘हॉटेल समाधान’मध्ये येतात. खास मालवणी पदार्थ बनवण्यासाठी अविनाश यांनी कोकणातून आचारी आणले आहेत. त्यांच्यामार्फत हे पदार्थ बनवले जातात.

सुरमई फ्राय, सुरमई मसाला, पापलेट फ्राय, बांगडा फ्राय, फिश कोळीवाडा, फिश टिक्का, कोळंबी मसाला, बोंबील रवा फ्राय, फिश तंदुरी हे समुद्री मासे येथे मालवणी पद्धतीमध्ये बनवले जातात. मुख्यत: याच पदार्थाना येथे जास्त मागणी आहे. वसई स्थानकाजवळच असल्याने आणि आजूबाजूला महाविद्यालय, वस्ती असल्याने तरुणाईपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सारेच खवय्ये येथे या पदार्थावर ताव मारण्यासाठी येतात. हे सर्व मासे अविनाश स्वत: नायगाव आणि वसई पाचुबंदर येथील मासळी बाजारातून खरेदी करतात, तसेच ते ताजे असल्याची शहानिशा करूनच ते विकत घेतात. त्यामुळे नेहमी ताजे मासे येथे खवय्यांना नेहमी दिले जातात.

शॉरमासाठीही हे उपाहारगृह प्रसिद्ध आहे. झटपट तयार होऊन पटकन हातात मिळणार असा पदार्थ असल्याने येथील तरुणाईची शॉरमा खाण्यासाठी झुंबड पहावयास मिळते. या पदार्थासह सुका चिकन, सुका मटण, चिकन मसाला हे अधिक मालवणी पदार्थ तर तंदूरमध्ये तंदूर मूर्गा, मूर्गा टिक्का, मूर्गा टिक्का मसाला, बटर चिकन शिख कबाब मसाला येथे चाखायला मिळतात. मांसाहारासह शाकाहारी पदार्थाचा पर्यायही खवय्यांना उपलब्ध आहे. मशरूम ग्रेव्हीमधील विविध पदार्थ, पनीर ग्रेव्हीमधील विविध पद्धतीचे पदार्थ येथे आहेत, तर चायनीजपासून ते दक्षिण भारतीय पदार्थ अविनाश यांनी या उपाहारगृहात ठेवले आहे. पदार्थ बनविण्यासाठी लागणारे मालवणी आणि इतर मसाले अविनाश स्वत: बनवून घेतात. त्यामुळे मालवणी पदार्थाची चव आम्ही टिकवून ठेवण्यात यशस्वी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

  • पत्ता : हॉटेल समाधान, महापालिका कार्यालयासमोर, वसई स्थानक रोड, वसई पश्चिम
  • वेळ : सकाळी ११ ते ४, सायंकाळी ७ ते रात्री ११