करोनाकाळातील कारवाईमुळे नाराजीचा सूर

भगवान मंडलिक, लोकसत्ता

डोंबिवली : करोनाकाळातील आर्थिक मंदीचा सामना करताना नाकीनऊ आलेल्या डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि औद्योगिक सुरक्षा, आरोग्य संचालनालयाने काढलेल्या नोटिसांमुळे घाम फुटला आहे. कंपनीच्या आवारातील अतिक्रमणे तसेच सुरक्षा उपाययोजना करण्यात हयगय होत असल्याचे कारण देत ४५० पेक्षा अधिक उद्योजकांना या नोटिसा काढण्यात आल्या आहेत. गेली अनेक वर्षे या प्रकारांकडे डोळेझाक करणाऱ्या प्रशासनाने या कारवाईसाठी करोनाचा संकटकाळ निवडल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

अतिक्रमणाचा मुद्दा अधोरेखित करत रासायनिक, कापड, यांत्रिकी विभागातील कंपन्यांना अशा प्रकारच्या नोटिसा सहा महिन्यांपूर्वी एमआयडीसीने दिल्या होत्या. या नोटिसा चुकीच्या पद्धतीने बजाविण्यात आल्या आहेत, अशी ओरड करत उद्योजकांनी बेमुदत आंदोलन सुरू केले होते. दरम्यानच्या काळात करोनाचा संसर्ग वाढू लागला. मार्च ते जूनपर्यंत बहुतांशी कंपन्या करोनाच्या संसर्गाने बंद होत्या. उत्पादन घटले, आवक कमी झाली. अशा परिस्थितीत कामगारांना वेतन देणे, वीज देयक, मालमत्ता, पाणी देयक, कर्जाचे हप्ते फेडणे असा बोजा उद्योजकांवर पडला आहे. अशा बिकट काळात एमआयडीसीने उद्योजकांना नव्याने नोटिसा पाठवून कोंडीत पकडले आहे, अशा तक्रारी आता उद्योजक करू लागले आहेत.

कल्याणमधील औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालयाने (डिश) एमआयडीसीतील ४० उद्योजकांना सुरक्षा उपाय करण्यासंदर्भात नोटिसा बजावल्या आहेत. कंपन्यांमधील वाढते अपघात, आगीच्या घटना विचारात घेऊन या नोटिसा बजावल्या आहेत. अनेक उद्योजकांनी सामासिक अंतरात बांधकामे केली आहेत. अग्निशमन वाहन कंपनीच्या चारही बाजूने फिरले पाहिजे. कंपनीच्या चारही बाजूने अग्निरोधक यंत्रणा बसवायची असेल तर सद्य:परिस्थितीत ते शक्यच होणार नाही, असे अनेक उद्योजकांनी सांगितले.

एमआयडीसीमधील जी बांधकामे तोडण्यासारखी आहेत, ती तोडण्यात येतील आणि आवश्यक बांधकामे नियमित केली जातील, असे ठरले होते. टाळेबंदीमुळे कंपनी चालक मेटाकुटीला आले आहेत. त्यामुळे नोटिसांविषयी उद्योजकांसोबत चर्चा व्हायला हवी.

– देवेन सोनी, ‘कामा’चे अध्यक्ष

कंपनी आवारात बांधकाम परवानगी न घेता काही नियमबा कामे करण्यात आली आहेत. यामुळे अपघात, सुरक्षा नियमांचे पालन होत नाही. अशा प्रकारची बांधकामे करणाऱ्या कंपनी चालकांना नोटिसा दिल्या आहेत.

– संजय ननावरे, कार्यकारी अभियंता, एमआयडीसी

कंपन्यांनी सुरक्षेसंदर्भात उपाययोजना कराव्यात म्हणून ४० उद्योजकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. नोटिशीप्रमाणे त्यांनी कार्यवाही करून उपाययोजना करावयाच्या आहेत.

– पी. जी. गोरेने, औद्योगिक निरीक्षक