कल्याणी पाटील यांना नोटीस
कल्याण-डोंबिवलीच्या महापौर कल्याणी पाटील आणि सभागृह नेते कैलास शिंदे एका बडय़ा इंग्रजी वृत्तपत्रातील ‘पेड न्यूज’प्रकरणी अडचणीत सापडले आहेत. निवडणूक आयोगाने या दोघांनाही नोटिसा बजावल्या असून येत्या तीन दिवसांत या पदाधिकाऱ्यांना खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती महापालिका निवडणूक आचारसंहिता पथकप्रमुख जमीर लेंगरेकर यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.
काही महिन्यांपूर्वी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतील एका ठरावानुसार पत्रीपूल येथील कुष्ठरुग्ण वसाहतीमधील रहिवाशांना एक हजार रुपयांऐवजी अडीच हजार रुपयांचे मानधन देण्याचे ठरले होते. या रकमेच्या धनादेश वाटपाचा कार्यक्रम तीन महिन्यांपूर्वी उरकण्यात आला. यासंबंधीचे अनेक वर्तमानपत्रांनी त्यास प्रसिद्धीही दिली होती. असे असताना शनिवारी एका बडय़ा इंग्रजी वर्तमानपत्रात कुष्ठरुग्ण वसाहतीमधील रहिवाशांना कल्याणी पाटील, कैलास शिंदे अडीच हजार रुपये धनादेशाचे वाटप करीत असल्याचे वृत्त छायाचित्रांसह प्रसिद्ध झाले. या प्रकरणी त्यांना तात्काळ नोटीस बजाविण्यात आली आहे, असे लेंगरेकर यांनी सांगितले. आचारसंहिता असताना हे वृत्त प्रसिद्ध झाल्याने आचारसंहिता पथकाला हे वृत्त संशयास्पद वाटले. यामुळे नोटिसा बजावल्या आहेत, अशी माहिती लेंगरेकर यांनी दिली. याबाबत प्रतिक्रियेसाठी पाटील तसेच कैलास शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न करण्यात आला.

कल्याणी पाटील, कैलास शिंदे यांना पेड न्यूजप्रकरणी नोटिसा पाठवल्या आहेत. त्यांच्याकडून समाधानकारक खुलासा न आल्यास त्यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात येईल.
– जमीर लेंगरेकर,
आचारसंहिता प्रमुख,कडोंमपा