रासायनिक दुर्गंधीप्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई

दिवाळीच्या दिवसांत अंबरनाथ येथील मोरिवली भागातील औद्योगिक वसाहतीत झालेल्या वायुगळतीची गंभीर दखल घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सात कंपन्यांना नोटिसा बजावल्या आहेत. मोरिवली, बी केबिन रस्ता या भागातील नागरिक कंपन्यांतून सोडण्यात येणाऱ्या रासायनिक वायूविरोधात सातत्याने तक्रारी करीत होते. या पार्श्वभूमीवर कंपन्यांनी रासायनिक दुर्गंधीबाबत ठोस उपाययोजना न केल्यास त्यांना टाळे ठोकले जाईल, असा इशारा प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिला आहे.

अंबरनाथ पश्चिमेतील औद्योगिक वसाहत आणि पूर्वेतील कचराभूमी यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याप्रकरणी सातत्याने तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात होता. याच काळात अंबरनाथ पश्चिमेतील मोरिवली औद्योगिक वसाहतीतील फेसिया कंपनीला भीषण आग लागली. त्यानंतर स्थानिकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली होती. दिवाळीच्या काळात अंबरनाथकरांनी याप्रकरणी मानवी साखळी करीत निषेधही नोंदवला होता. या तक्रारींची दखल प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतली आहे.

मंडळाकडून गेल्या काही दिवसांत मोरिवली भागातील कंपन्यांची पाहणी करण्यात आली. या वेळी कंपनीतील सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा, तीची क्षमता, वायुप्रदूषणावर नियंत्रण करणारी यंत्रणा, तिची कार्यक्षमता अशा गोष्टींची पाहणी करण्यात आली. या पाहणीवेळी सात कंपन्यांमध्ये या यंत्रणा योग्यरीत्या काम करीत नसल्याची बाब समोर आल्याची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाचे मंचक जाधव यांनी दिली आहे. यात नुकत्याच आग लागलेल्या फेसिया कंपनीसह आशा इंटरप्रायझेस, मुकुंद ओव्हरसीज, कनाड केमिकल, ट्रायेथिक लॅबोरटरीज, हॅलाइड केमिकल आणि असलन नेट इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांचा समावेश असल्याचे जाधव यांनी सांगितले आहे. या कंपन्यांना पूर्ण क्षमतेने प्रक्रिया न करणे, सांडपाणी थेट बाहेर सोडणे, वायुप्रदूषण यंत्रणा योग्यरीत्या न हाताळणे अशा कारणांवरून नोटीस देण्यात आली असून त्यांच्याकडून त्यावर तात्काळ उपाययोजना करण्याचे प्रस्थापित निर्देश देण्यात आले आहेत. पाहणीत समाधानकारक उत्तर न मिळाल्यास त्या कंपन्यांवर बंदीचा निर्णयही घेतला जाईल, असेही मंचक जाधव यांनी स्पष्ट केले आहे. या नोटिसवर किती वेळात अंमलबजावणी करतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.