भगवान मंडलिक

डोंबिवलीतील चार हजार ५५४ शेतकऱ्यांच्या ५८ एकर भूसंपादनाचे पालिकेसमोर आव्हान

डोंबिवली ते टिटवाळ्यादरम्यान उल्हास खाडीकिनाऱ्याने जाणारा २१ किलोमीटर लांबीचा बाह्य़वळण रस्ता बांधण्यात येणार आहे. डोंबिवलीजवळील सात गावांच्या हद्दीतील जमीन या कामासाठी संपादन करण्यासाठी पालिकेने चार हजार ५५४ शेतकऱ्यांना जाहीर नोटीस बजावली आहे.

शेतकरी, जमीनमालकांनी जमिनीचे सातबारा उतारे सादर करून आपल्या जमिनीच्या मोबदल्यात ‘हस्तांतरणीय विकास हक्क’ (टीडीआर) सादर करण्याचे प्रस्ताव देण्याचे आवाहन पालिकेच्या नगररचना विभागातर्फे शेतकऱ्यांना करण्यात आले आहे. सात गावांच्या हद्दीतील तुकडे पद्धतीतील ५८ एकर जमीन संपादित करण्यात येणार आहे. जाहीर नोटीस प्रसिद्ध होताच शेतकऱ्यांनी वार्षिक सरकारी मूल्यानुसार (रेडी रेकनर) भाव मिळावा, अशी आग्रही मागणी सुरू केली आहे.

बाह्य़वळण रस्त्यासाठी शीळ फाटय़ाजवळील माणगाव, सागाव, हेदुटणे, घारिवली, भोपर, आयरे, कोपर, जुनी डोंबिवली, ठाकुर्ली, गावदेवी, शिवाजीनगर, चोळे, कांचनगाव, कचोरे, कल्याण, वाडेघर, उंबर्डे, कोळीवली, गंधारे, बारावे, वडवली, अटाळी, आंबिवली, बल्याणी, मांडा आणि टिटवाळा गावांच्या हद्दीतील ३०७ एकर जमीन संपादित करण्यात येणार आहे. या जमिनीपैकी १८४ एकर जमीन ताब्यात असल्याचा पालिकेचा दावा आहे. १२२ एकर जमीन संपादित करण्याचे आव्हान पालिकेसमोर आहे. दोन वर्षांत पालिकेने कल्याण ते टिटवाळा भागातील वळण रस्त्यासाठी ७० टक्के आणि डोंबिवलीत ४० टक्के जमीन संपादित केली आहे, असे नगररचना विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले. दोन्ही शहरांतून ९० टक्के भूसंपादन करण्याचे आव्हान पालिकेसमोर आहे. बाह्य़वळण रस्त्यासाठी भूसंपादनासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या जमीन क्षेत्रफळाप्रमाणे ‘टीडीआर’ देण्यात येणार आहे. कोणाही शेतकऱ्याचे नुकसान होणार नाही अशा पद्धतीने भूसंपादन केले जाईल. नंतर वळण रस्त्याचे काम तातडीने हाती घेणे शक्य होणार आहे, असे  नगररचना अधिकाऱ्यांनी सांगितले.

२७ गावांचा विरोध

२७ गावांच्या हद्दीतील माणगाव, सागाव, भोपर, घारिवली, हेदुटणेतील जमीनमालकांनी या कामाला विरोध केला आहे. वळण रस्त्यांच्या मध्येच चाळी, इमारती, बंगले बांधण्यात आले आहेत. भोपरमध्ये एका पुढाऱ्याने आराखडय़ातील रस्त्यात प्रशस्त बंगला बांधला असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. रेतीबंदर, ठाकुर्ली परिसरातील बाह्य़वळण रस्त्याची ८२ एकर जमीन ‘सीआरझेड’ने बाधित होत आहे. ‘भूसंपादन करताना शेतकऱ्यांना पालिका हद्दीत शीघ्र गणकाच्या अडीच पट, ग्रामीण भागात चार पट मोबदला द्यावा. टीडीआर दिला तर विकासक शेतकऱ्यांची पिळवणूक करतील. वारसांना पालिकेत नोकरी द्यावी, विस्थापितांचे पुनर्वसन करावे’, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक वामन म्हात्रे यांनी आयुक्तांकडे केली आहे.