वाहतूक नियम मोडणाऱ्यांवरील कारवाईसाठी संगणकाची मदत;  ‘ट्रफमॅन-ठाणे’ संगणक प्रणालीचा वापर सुरू

वाहन चालविताना वाहतूक नियम पायदळी तुडविण्याचा गुन्हा सातत्याने करत असाल तर यापुढे अशा गुन्ह्य़ामुळे तुमचा वाहन परवाना कायमचा रद्द करण्याची तयारी ठाणे वाहतूक पोलिसांनी सुरू केली आहे. ठाणे वाहतूक पोलिसांनी दैनंदिन कामकाजासाठी एका खासगी कंपनीने विकसित केलेल्या ‘ट्रफमॅन-ठाणे’ या संगणक प्रणालीचा वापर सुरू केला असून या प्रणालीमुळे सातत्याने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची माहिती वाहतूक पोलिसांना एका क्लिकवर मिळणार आहे. या माहितीच्या आधारे अशा चालकांचे वाहन परवाने रद्द करण्यासाठी ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाकडे शिफारसपत्र पाठविण्याची योजना वाहतूक पोलिसांनी आखली आहे. त्यामुळे वेळोवेळी वाहतूक नियम मोडणाऱ्यांची यापुढे खर नाही.

वाहतूक नियम मोडणाऱ्या चालकांचे वाहन परवाने रद्द करण्याची तरतूद आहे. मात्र मानवी पद्धतीने वाहतूक पोलिसांचे कामकाज सुरू असल्याने अशा चालकांची माहिती जमा करणे शक्य होत नव्हते. तसेच अशा चालकांचा शोध घ्यायचा असेल तर सर्व दंडाच्या पावत्या तपासाव्या लागत होत्या. हे काम कामकाज अतिशय किचकट असल्यामुळे वाहनचालक कायद्याच्या कचाटय़ातून सुटत होते. तसेच कायद्याची अंमलबजावणी होत नसल्यामुळे वाहतूक नियम मोडण्याची प्रवृत्ती वाढू लागल्याचे चित्र आहे. या शिवाय, विविध चौकाचौकातील पोलिसांनी किती कारवाई केली आणि त्यांनी किती दंडाची वसुली केली, याचा तपशीलही मानवी पद्धतीने नोंदविला जात होता. यामुळे त्यामध्ये अनेकदा राहिलेल्या त्रुटी दुरुस्त करण्यात कर्मचाऱ्यांचा वेळ वाया जात होता. या पाश्र्वभूमीवर ठाणे वाहतूक शाखेने दैनंदिन कामकाजासाठी ‘ट्रफमॅन-ठाणे’ या संगणक प्रणालीचा वापर सुरू केला आहे.

‘डिस्फॉट ग्लोबलटेक’ या कंपनीने ही प्रणाली विकसित केली आहे. तसेच ही प्रणाली कशा पद्धतीने हाताळायची, याविषयी कंपनीच्या संचालिका लुना बोरह यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. ठाणे ते बदलापूपर्यंत असलेल्या वाहतूक शाखेच्या प्रत्येक युनिटच्या कर्मचाऱ्याने दिवसभरात किती कारवाई केली, याची माहिती युनिटच्या पातळीवर नोंदविली जाते. यामुळे हेल्मेट, सिग्नल तोडणे आणि इतर गुन्हे किती झाले आणि कोणत्या ठिकाणी घडले, तसेच कोणत्या वाहनचालकाने किती वेळा वाहतूक नियम मोडले, या सर्वाची माहिती प्रणालीत संकलित होत आहे. याशिवाय, कर्मचारीनिहाय कारवाईची आकडेवारी नोंद होत आहे.

विशेष म्हणजे, या प्रणालीसाठी युनिट पातळीवर ‘युझर आयडी’ दिल्यामुळे वाहतूक पोलीस संगणक किंवा मोबाइलवर ही माहिती पाहू शकतात, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. या संदर्भात ठाणे वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांच्याशी संपर्क साधला असता, या प्रणालीच्या माध्यमातून वाहतूक विभागाने पेपरलेस कारभाराच्या दिशेने पहिले पाऊल टाकले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या प्रणालीमुळे कारभारात पारदर्शकता येत आहे. याशिवाय, विविध कारवायांची माहिती संकलित होत असून त्यांचे वाहन परवाने निलंबित किंवा रद्द करण्याचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन विभागाकडे पाठविण्यात येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.