News Flash

आगरी महोत्सवात महागडय़ा गाडय़ांची विक्री

डोंबिवलीतील सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुलात ४ डिसेंबरपासून आगरी महोत्सवाला मोठय़ा दिमाखात सुरुवात झाली.

आगरी महोत्सव

पारंपरिक उत्सवावर कॉपरेरेट संस्कृतीची छाप
बदलत्या आर्थिक परिस्थितीचे पडसाद येथे दरवर्षी भरणाऱ्या आगरी महोत्सवातही उमटू लागले असून पारंपरिक खाद्यपदार्थ, सुकी मासळींबरोबरच एरवी शोरूम्सच्या कोंदणातच असणाऱ्या चार चाकी गाडय़ांची विक्रीही येथील तंबूवजा स्टॉल्समधून होऊ लागली आहे. यंदाच्या महोत्सवात यात हुंदाई, होंडा, शेवरोले, रेनॉल्ट यांसोबतच मर्सिडीज कंपनीने यंदा प्रथमच येथे वाहनांचा स्टॉल लावला आहे. तसेच ज्यांना नवीन कार घेणे जमत नाही, त्यांच्यासाठी यंदा प्रथमच सेकंड हॅण्ड कारचा पर्यायी स्टॉलही उपलब्ध आहे.
डोंबिवलीतील सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुलात ४ डिसेंबरपासून आगरी महोत्सवाला मोठय़ा दिमाखात सुरुवात झाली आहे. डोंबिवलीतील आगरी महोत्सव हा या समाजाचा सर्वात मोठा उत्सव मानला जातो. त्यामुळे ठाणे तसेच रायगड जिल्ह्य़ातून मोठय़ा संख्येने आगरी लोक येथे येतात. याशिवाय सर्वसामान्य नागरिकांचीही या महोत्सवात गर्दी असते.
जिभेचे चोचले पुरविणाऱ्या आगरी पद्धतीच्या सामिष भोजनाचे बेत या पारंपरिक वैशिष्टय़ांबरोबरच गेल्या काही वर्षांपासून या महोत्सवात दागिने, बँका, महागडय़ा गाडय़ांचे स्टॉल्सही दिसू लागले आहेत. विविध बॅंका, ज्वेलर्स व वाहनांच्या स्टॉलची जास्त संख्या महोत्सवात दिसते. तरुणांचा जास्त ओढा येथे असणाऱ्या गाडय़ांच्या स्टॉलकडेच आहे. यंदा पाच खाजगी कंपन्यांनी येथे दुकाने थाटली आहेत.
दिवसाला दहा ते पंधरा नागरिक गाडय़ांविषयी चौकशी करून जातात. या महोत्सवात नव्याने बाजारात येणारे मॉडेल्स आम्ही सादर करतो. होंडा सिटी, जॅझ, अमेझ यातील मॉडेल आम्ही येथे मांडले आहेत. अनेकजण चौकशी करत असून नंतर शोरूममध्ये येऊन ते कार खरेदी करतात. येथे चांगला प्रतिसाद मिळत असल्याने दरवर्षी येथे स्टॉल आम्ही मांडतो. – चंद्रकांत बनसोडे, होंडा प्रतिनिधी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2015 3:15 am

Web Title: now expensive car selling in agari festival
Next Stories
1 नवअंबरनाथकर प्रदूषणाच्या विळख्यात
2 कल्याण-डोंबिवली पालिकेचे बेकायदा बांधकामांकडे दुर्लक्ष
3 अभिनय क्षेत्रात येणाऱ्या पिढीने सावधगिरी बाळगावी
Just Now!
X