ठाणे, कळवा तसेच मुंब्रा या तिन्ही शहरांतून दररोज निघणाऱ्या सुमारे ९२ मेट्रिक टन प्लॅस्टिक कचऱ्यापासून इंधन निर्मिती करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. वारंवार आवाहन करूनही अजून शहरात मोठय़ा प्रमाणावर प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर सुरू आहे. दररोज कचरासफाई करताना मोठय़ा प्रमाणावर प्लॅस्टिक पिशव्या तसेच प्लॅस्टिक साहित्य आढळून येत असल्याने त्याची विल्हेवाट लावण्यासाठी हा प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वागळे इस्टेट भागात खासगी तत्त्वावर या प्रकल्पाची पायाभरणी केली जाणार असली तरी अशा प्रकारच्या प्रयोगांच्या यशस्वितेविषयी मात्र शंका उपस्थित केल्या जात आहेत.प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पासाठी सुमारे एक कोटी २१ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या नव्या प्रकल्पामुळे तिन्ही शहरांतील प्लॅस्टिक कचऱ्याची समस्या मार्गी लागेल, असा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. तसेच निर्माण होणाऱ्या इंधनातून महापालिकेस चांगले उत्पन्नही मिळू शकेल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. ठाणे महापालिका क्षेत्रामधून दररोज सुमारे ९२ मेट्रिक टन प्लॅस्टिकचा कचरा निघतो. त्यापैकी ७० ते ७५ टक्के कचरा पुनर्वापरासाठी वेचकांकडून गोळा करण्यात येतो. उर्वरित कचऱ्याचा पुनर्वापर होत नसल्याने तो क्षेपणभूमीवर टाकण्यात येतो. बराचसा प्लॅस्टिक कचरा नाल्यामध्ये जाऊन शहरात पुरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे या प्लॅस्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावून त्यापासून इंधननिर्मितीचा प्रकल्प उभारणीचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. वागळे इस्टेट येथील सी. पी. तलाव भागात दोन हजार चौरस फूट जागा उपलब्ध असून तिथे हा प्रकल्प उभारण्यास घनकचरा विभागाने हिरवा कंदील दाखविला आहे. या जागेवर खासगी लोकसहभागातून (पीपीपी) सुमारे दोन टन क्षमतेचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या कामाचा ठेका संबंधित कंपनीला सात वर्षांकरिता देण्यात येणार असून या प्रकल्पाची निगा तसेच देखभाली कंपनीलाच करावी लागणार आहे. त्यामुळे संबंधित कंपनी इंधनविक्रीतून हा सर्व खर्च करणार आहे. तसेच इंधनविक्री उत्पन्नातील काही वाटा महापालिकेस देणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प राबविण्यात येणार असून त्यातून महापालिकेला उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण होणार आहे. मात्र, या प्रकल्पाच्या यशस्वितेविषयी मात्र प्रशासनाने कोणताही ठोस दावा केलेला नाही.
या प्रकल्पाचा सविस्तर प्रस्ताव महापालिकेच्या प्रदूषण विभागाने तयार केला असून तो येत्या गुरुवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे अंतिम मान्यतेसाठी सादर केला आहे.
प्लॅस्टिकपासून इंधन
पेट्रोलियम पदार्थापासून प्लॅस्टिक तयार करण्यात येत असल्याने पायरोलेसीस पद्घतीने त्याचे तेल (ऑइल) बनविता येते.
या पद्धतीमध्ये प्लॅस्टिक कचरा ऑक्सिजन वायूविरहित प्रकल्पामध्ये वितळविले जाते आणि त्यापासून तेल तयार करण्यात येते.
या कचऱ्यापासून सुमारे ६५ ते ७० टक्के तेलाची निर्मिती होते. तर १० ते १२ टक्के कार्बन पावडर आणि ज्वलनासाठी हायड्रो कार्बन गॅस तयार होतो.
या तेलाचा वापर डिझेल, जनरेटर, औद्योगिक कंपन्यांमध्ये ग्रीसिंगसाठी करण्यात येतो. ’तसेच हायड्रो कार्बन गॅस हा प्रकल्पामध्ये ज्वलनासाठी वापरण्यात येत असल्याने विजेचा वापर कमी होतो.
या प्रकल्पामध्ये द्रवरूपी कचरा तयार होत नाही, असा दावा प्रशासनामार्फत केला जात आहे.