नऊ वर्षांपासून ३२ कोटींची रक्कम थकीत

गेल्या नऊ वर्षांपासून ३२ कोटी ५२ लाख २४ हजार रुपये मालमत्ता कर थकीत असल्याने कल्याण-डोंबिवली महापालिकेने मंगळवारी कंपनीची मालमत्ता जप्त केली असून ती लवकरच विक्रीस काढण्यात येईल, असे करनिर्धारक व संकलक अनिल लाड यांनी सांगितले.

गेल्या आठ ते नऊ वर्षांपासून एनआरसी कंपनीने पालिकेची मालमत्ता कराची ६ कोटी ६८ लाखांची रक्कम थकवली होती. ही रक्कम भरण्यास कंपनी सतत टाळाटाळ करीत होती. या प्रकरणी तत्कालीन कामगारमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली होती. कामगारमंत्र्यांच्या आदेशावरून पालिका आणि कंपनी यांनी स्टेट बँकेत एक संयुक्त खाते उघडावे. त्यात कंपनीने कराची थकीत रक्कम भरणा करावी, असे आदेश दिले होते. या खात्यात कंपनीने पुरेसे पैसे न भरल्याने पालिकेने १० हजार खर्च करून उघडलेले खाते जप्त केले.

कंपनीच्या भूखंडाची विक्री करून कर भरणा पालिकेत करण्याचे आश्वासन कंपनीने पालिकेला दिले होते. हे आश्वासनही कंपनीने पाळले नाही. त्यामुळे मालमत्ता कराची कंपनीकडे ३२ कोटी ५२ लाख २४ हजारांची थकबाकी वाढत गेली. कंपनीने कर भरणा करीत नाही हे निदर्शनास आल्यावर एनआरसीची मालमत्ता जप्त करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला. कंपनी जागेची विक्री करून हा मालमत्ता कर भरणा वसूल करण्यात येणार आहे, असे लाड यांनी सांगितले.