वर्षभरात २१ ते ४० वयोगटातील करोनाबाधितांची संख्या ४५ हजारांहून अधिक; गेल्या दोन महिन्यांत आढळलेले ६० टक्के रुग्ण तरुण

ठाणे : करोना विषाणूचा सर्वाधिक धोका ४५ वर्षांवरील नागरिकांना तसेच सहव्याधी व्यक्तींना असल्याचे सांगितले जात असले तरी ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडील नोंदीतून या विषाणूने तरुणवर्गाला अधिक ग्रासल्याचे दिसून येते. गेल्या वर्षभरात करोनाबाधित झालेल्यांमध्ये ३१ ते ४० या वयोगटातील नागरिकांची संख्या सर्वाधिक असून २१ ते ४० या वयोगटातील ४५ हजारांहून अधिक जणांना करोनाची बाधा झाल्याचे आढळून आले. सध्या सुरू असलेल्या लाटेचा सर्वाधिक तडाखा याच वयोगटातील नागरिकांना बसत आहे. मार्च महिन्यापासून ३१ ते ४० वयोगटातील जवळपास १३ हजारांहून अधिक रुग्ण बाधित झाले आहेत.

गेल्या वर्षी मार्च महिन्यात ठाणे शहरात करोनाने बाधित पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर आतापर्यंत सापडलेल्या एक लाख १७ हजार रुग्णांपैकी एक लाख ४ हजार ५३० रुग्ण बरे झाले आहेत. महापालिका प्रशासनाने करोनाकाळातील एकूण रुग्णांची त्यांच्या वयोगटाप्रमाणे वर्गवारी केली आहे. त्यानुसार २१ ते ३० आणि ३१ ते ४० या तरुणवर्ग दर्शवणाऱ्या वयोगटातील करोनाबाधितांची संख्या अनुक्रमे १९ हजार ५९७ आणि २६ हजार ६१ इतकी आहे. या दोन्ही वयोगटांचा एकत्रित विचार करता ४५ हजार ६५८ करोनाबाधित तरुणवर्गातील असल्याचे दिसून येते. त्यापैकी ८९ जणांचा मृत्यू झाला. २८ एप्रिलपर्यंत महापालिका क्षेत्रात ११ हजार ६४ रुग्ण उपचाराधीन असून यातही ३१ ते ४० वयोगटातील रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. सध्या या वयोगटातील २ हजार ६०७ नागरिकांवर करोनाचे उपचार सुरू आहेत.

३१ ते ४० वयोगटातील नागरिकांपाठोपाठ ४१ ते ५० वयोगटातील रुग्णांचा अधिक संख्येने समावेश आहे. करोनाकाळात महापालिका हद्दीत आतापर्यंत या वयोगटातील २२ हजार ४७ रुग्ण सापडले असून २०१६ रुग्णांवर सद्य:स्थितीत उपचार सुरू आहेत. शहरात १ हजार ७७२ ज्येष्ठ नागरिकांवर करोनाचे उपचार सुरू आहेत. त्यामध्येही पुरुषांचे प्रमाण अधिक असल्याचे पाहायला मिळत आहे. आतापर्यंत १६ हजार ९९३ ज्येष्ठ नागरिक हे करोनामुक्त झाले आहेत. तर, ९८५ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

दुसऱ्या लाटेत बाधा जास्त

करोना संसर्गाच्या पहिल्या टप्प्यात ३१ ते ४० वयोगटातील रुग्णांचा समावेश तुलनेने कमी होता. नव्याने आलेल्या लाटेत मात्र या वयोगटातील नागरिक अधिक संख्येने बाधित होत आहेत, असा महापालिकेचा दावा आहे. याच काळात या वयोगटातील मृत्यूचे प्रमाणही वाढले असून बहुतांश मृतांना इतरही व्याधी असल्याचे दिसून आले आहे, अशी माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली. या वयोगटात आतापर्यंत ६८ मृत्यू झाले असून दुसऱ्या लाटेत यापैकी ६५ टक्क्य़ांहून अधिक मृत्यूंची नोंद झाली आहे, अशी माहिती महापालिकेतील सूत्रांनी दिली. निदान झाल्यानंतरही उशिरा उपचाराला सुरुवात करणे, तसेच चाचणी अहवालातील संभ्रमामुळे बराच काळ घरी राहून उपचार घेणे असे प्रकारही या वयोगटात अधिक आढळत आहेत, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.