रुग्णांचा आकडा दररोज ७०० ते ८००

कल्याण : गेल्या काही दिवसांपासून कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील करोनाबाधितांची संख्या उतरंडीला लागली आहे. एप्रिल महिन्याच्या मध्यावर शहरात दररोज दोन ते अडीच हजारांच्या घरात रुग्ण सापडत होते. हा आकडा आता दररोज ७०० ते ८०० पर्यंत खाली आला आहे. करोना चाचण्यांची संख्याही कमी झाली असून लक्षणे कमी झाल्याचा हा परिणाम आहे असा दावा केला जात आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून पालिका हद्दीतील करोना रुग्णसंख्या वाढू लागली. त्यानंतर प्रशासनाने दररोजच्या चाचण्याही वाढविल्या. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत दररोज २००० ते २२०० पर्यंत चाचण्या होत असत. हा आकडा सव्वातीन हजारांपर्यंत वाढविण्यात आला. तसेच प्रतिजन चाचण्यांची संख्याही वाढविण्यात आली. करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी गेल्या महिन्यापासून कठोर निर्बंध लागू आहेत. प्रत्येक रहिवासी, विक्रेता, फेरीवाला, पादचारी यांनी मुखपट्टी वापरावी यासाठी आग्रह धरला जात आहे. मुखपट्टी न वापरणाऱ्यांना दंड ठोठावला जात आहे.

रहिवाशांमध्येही करोना प्रतिबंधाचे नियम पाळण्याचे प्रमाण वाढले आहे. रस्त्यावरील वर्दळ थांबली आहे. लोकलमध्ये अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांना प्रवासाला मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील करोना साखळी तुटण्यास कठोर निर्बंधाचा मोठा हातभार लागला आहे, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. मोठ्या वस्त्या, गृहसंकुले हीच करोना संसर्गाची सर्वात मोठी ठिकाणे आहेत. बहुतांशी करोनाबाधित रहिवासी गृहविलगीकरणाला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे पालिका करोना काळजी केंद्र, रुग्णालयांवर येणारा भार काही प्रमाणात कमी झाला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून पालिका हद्दीत पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे, असे पुरवठादार भाऊसाहेब चौधरी यांनी सांगितले. त्यामुळे गेल्या २० दिवसांसारखी परिस्थिती शहरात राहिली नाही, असे पालिका अधिकारी सांगतात.

पाच ते साडेपाच हजार करोना चाचण्या

गेल्या आठवड्यापासून पालिका हद्दीत करोनाच्या पाच ते साडेपाच हजार चाचण्या केल्या जात आहेत. या चाचण्यांमधून ८०० ते ९०० रुग्ण बाधित आढळून येत आहेत. महापालिका हद्दीत सद्य:स्थितीत सहा हजार ७३१ खाटा आहेत. खाटांवर सहा हजार २०० रुग्ण उपचार घेत आहेत. विलगीकरणात तीन हजार ३५५ खाटा आहेत. या खाटांवर तीन हजार ३५० रुग्ण उपचार घेत आहेत. प्राणवायूच्या दोन हजार ४७७ खाटा आहेत. त्यावर दोन हजार ६५ रुग्ण, अतिदक्षता विभागाच्या एक हजार चार खाटा त्यावर ७६५ रुग्ण, जीवरक्षक यंत्रणेच्या २१८ खाटा त्यावर ६५ रुग्ण उपचार घेत आहेत.