मानसी जोशी

नोकरी आणि व्यवसायाच्या संधी कमी असल्याने ग्रंथ संचालनालयातर्फे चालवण्यात येणाऱ्या ग्रंथपालन समिती प्रमाणपत्र वर्गाच्या विद्यार्थी संख्या रोडावल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या तीन वर्षांत या प्रमाणपत्र वर्गास गळती लागल्याचे चित्र निदर्शनास येत आहे.

सरकारी अनुदानित शाळांमध्ये एक हजारापेक्षा अधिक विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांमध्ये ग्रंथपाल या पदाची नेमणूक करणे अपरिहार्य आहे. राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयासाठी आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करणे यासाठी ग्रंथालय संचालनालयातर्फे   ग्रंथपालन प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात येतात. महाराष्ट्रात २८ जिल्ह्य़ांत ग्रंथपालन प्रमाणपत्र समितीचे वर्ग आयोजित करण्यात येतात. या प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाचा कालावधी हा दोन महिन्यांचा असून दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारास या वर्गास प्रवेश मिळतो. दर वर्षी एप्रिल आणि मे महिन्यांत हे वर्ग आयोजित करण्यात येतात. जून महिन्यात या प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाची परीक्षा घेण्यात येते. हा प्रशिक्षण वर्ग उत्तीर्ण झालेल्या उमेदवारास सार्वजनिक आणि शालेय ग्रंथालयात नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत; परंतु दहावी आणि प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असलेल्या उमेदवारास शिक्षणाच्या तुलनेत मिळणारे वेतन कमी असते, असे उत्तीर्ण विद्यार्थ्यांकडून स्पष्ट करण्यात आले. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारास ठाणे नगर वाचन मंदिर आणि मराठी ग्रंथसंग्रहालयात शिकाऊ कामावर संधी मिळते, असे मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या प्रणाली कोबल यांनी सांगितले.

या वर्गाच्या अभ्यासक्रमात ग्रंथालय व्यवस्थापन, संदर्भसेवा, वर्गीकरण, तारिकीकरण यासह तीन विषयांचा समावेश केला आहे, तर दुसरीकडे मुंबई विद्यापीठातर्फे ग्रंथालय आणि माहितीशास्त्र या विषयाचा दोन वर्षांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम चालवण्यात येतो. हा अभ्यासक्रम उत्तीर्ण झाल्यास विद्यार्थ्यांला ग्रंथालयात तसेच महाविद्यालयात नोकरीची संधी आणि मिळणारे वेतनसुद्धा अधिक असल्याने वर्गास प्रवेश घेणाऱ्यांची संख्या कमी आहे, असे ठाण्यातील महाविद्यालयाच्या ग्रंथपालांकडून सांगण्यात आले आहे.

या वर्षी ठाण्यामध्ये ७७ नोंदणी अर्जाची विक्री झाली असून ४५ विद्यार्थ्यांनी वर्गास प्रवेश घेतला आहे. १ मार्चपासून प्रशिक्षण वर्गास सुरुवात झालेली आहे. ठाणे जिल्ह्य़ात मों.ह विद्यालयांमध्ये ग्रंथपालन समितीचे वर्ग घेण्यात येतात, असे कोकण विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष राजेंद्र वैती यांनी सांगितले.

ठाणे जिल्ह्य़ाचा निकाल 

वर्ष            विद्यार्थी      उत्तीर्ण   अनुत्तीर्ण   उत्तीर्ण टक्केवारी

२०१६        ६०             ३९       २१           ६५

२०१७        ४८             २७       २१          ५६.२५

२०१८        ४२              २२      २०          ५२

या वर्षी ७५ टक्के प्रवेश प्रक्रिया पूर्ण झालेली असून या ग्रंथालय प्रमाणपत्र वर्गास मिळणारा प्रतिसाद चांगला आहे. वर्गात विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवण्यात येतात.

– राजेंद्र वैती, वर्ग व्यवस्थापक, ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षा