दिवसभरात ७१ नवे रुग्ण; ठाण्यात तिघांचा तर मीरा-भाईंदरमध्ये एकाचा मृत्यू

ठाणे जिल्ह्य़ात दिवसभरात करोनाबाधित ७१ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे हा आकडा एक हजारांच्या पुढे गेला आहे. दरम्यान चार करोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यात ठाण्यातील तीन, तर मीरा-भाईंदरमधील एकाचा समावेश आहे. ७१ पैकी ३४ रुग्ण ठाणे शहरातील तर २० रुग्ण हे नवी मुंबईतील आहेत.

बुधवारी जिल्ह्य़ात ६४ करोनाबाधित रुग्ण आढळले होते. त्यापाठोपाठ गुरुवारी जिल्ह्य़ात ७३ नवे रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे जिल्ह्य़ातील करोनाबाधितांची संख्या ९४० इतकी झाली होती. तसेच ठाणे शहरात गुरुवारी ३१ तर नवी मुंबईत २४ रुग्ण आढळून आले होते. असे असतानाच शुक्रवारी जिल्ह्य़ात ७१ नवे रुग्ण आढळले. त्यामध्ये ठाणे शहरातील ३४, कल्याण-डोंबिवली शहरातील ७, अंबरनाथमधील १, बदलापूरमधील १, मीरा-भाईंदरमधील ४, नवी मुंबईतील २० आणि ठाणे ग्रामीण भागातील ४ रुग्णांचा समावेश आहे. शुक्रवारी ७१ नवे रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्य़ातील रुग्णांची संख्या १०११ इतकी झाली आहे.

६९ रुग्ण करोनामुक्त : ठाण्यात करोनाबाधित रुग्ण उपचारानंतर घरी परतण्याचे प्रमाण वाढले आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात आजवर ६९ रुग्ण उपचारानंतर घरी परतले आहेत.  बाधित रुग्ण संख्येच्या तुलनेत हे प्रमाण २० टक्क्य़ांपेक्षा जास्त असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.  ठाणे महापालिका क्षेत्रातील वागळे इस्टेट, लोकमान्यनगर, कळवा, कोपरी, मुंब्रा अशा दाटीवाटीच्या वस्तींमध्ये करोनाचे रुग्ण मोठय़ा संख्येने आढळून येत आहेत. गेल्या दोन दिवसांत शहरामध्ये ५४ नवे रुग्ण आढळले होते. तसेच गुरुवापर्यंत शहरातील करोनाबाधितांची एकूण संख्या ३१० इतकी झाली होती. करोनाबाधितांचा आकडा ३००च्या पुढे गेल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. मात्र, आता करोनामुक्त रुग्ण संख्येत वाढ होत असल्याची दिलासादायक बाब पुढे आली आहे.