09 July 2020

News Flash

परिचारिकांचे आंदोलन

वेतनवाढीची मागणी; महापालिकेच्या प्रवेशद्वारावर ठिय्या

कल्याण-डोंबिवली पालिका मुख्यालयासमोर आंदोलन करत असलेल्या परिचारिका.

वेतनवाढीची मागणी; महापालिकेच्या प्रवेशद्वारावर ठिय्या

कल्याण: कल्याण-डोंबिवली महापालिका वैद्यकीय विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या राष्ट्रीय शहर आरोग्य अभियानांच्या माध्यमातून काम करणाऱ्या १९२ परिचारिकांनी सोमवारी रात्रीपासून महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर वेतन वाढीसाठी आंदोलन सुरू केले आहे.  इतर महापालिकांमध्ये या अभियानाच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या परिचारिकांना योग्य प्रमाणात वेतन मिळते. कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासन मात्र टाळाटाळ का करत आहे, अशा तक्रारी करत परिचारिकांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे.

मागील अनेक वर्षे या अभियानाच्या माध्यमातून महापालिकेच्या रुग्णालय, नागरी आरोग्य केंद्र, विविध प्रकारची सर्वेक्षणे, लसीकरण कामासाठी काम करतो. विविध प्रकारची कामे करूनही आम्हाला अनेक वर्षांपासून आठ हजार रुपये वेतनावर राबवून घेतले जाते. वेतन वाढविण्याची मागणी केली की आश्वासन देण्यात येते. मागील तीन वर्षांपूर्वी ‘समान काम समान वेतन’ कायद्याप्रमाणे आम्हाला वेतन वाढविण्यात येईल असे पालिकेकडून सांगण्यात आले. मात्र यासंबंधीचा प्रस्ताव आयुक्तांकडे अंतिम प्रक्रियेसाठी पाठविण्यात आला नाही. करोना रुग्ण शहरात वाढत आहेत. या कामासाठी लागणारी सर्व प्रकारची सर्वेक्षणे, करोना रुग्ण सेवा आव्हानात्मक परिस्थितीत, कुटुंबाचा दुय्यम विचार करून करत आहोत. तरी प्रशासन आमच्या वेतनाची दखल घेत नाही, असे या परिचारिकांनी सांगितले.

तीन महिन्यांपासून परिचारिका भरतीसाठी जाहिरात देण्यात येत आहे. त्यामध्ये परिचारिकांना ३० ते ३५ हजार वेतन देण्याचे आश्वासन दिले जाते. मग आम्ही अनेक वर्षे काम करून नवीन येणाऱ्या परिचारिकांच्या हाताखाली काम करायचे का, असा सवाल परिचारिकांनी केला आहे.

ठाणे, भिवंडी, मुंबई, नवी मुंबई पालिका सेवेतील परिचारिकांना २५ हजार वेतन, वाढीव कामाचा मोबदला मिळत आहे. कल्याण-डोंबिवली पालिका प्रशासन असा मोबदला आम्हाला देत नाही आणि अन्याय करत आहे. जोपर्यंत वेतन वाढीचे लेखी आश्वासन प्रशासनाकडून दिले जात नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा परिचारिकांनी दिला.

पालिका अधिकाऱ्याने सांगितले, परिचारिकांना वेतन वाढीसंदर्भात आश्वासन दिले आहे. मागणीचा नक्की विचार केला जाणार आहे. तरीही त्या आंदोलन मागे घेत नाहीत.

महापौरांनी लक्ष घालावे

आम्ही आंदोलन करत असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत ही खंतही मनात आहे. पण आमचाही आता विचार प्रशासनाकडून झाला पाहिजे. महापौर विनिता राणे स्वत: ज्येष्ठ परिचारिका आहेत. तेव्हा त्यांनी या विषयात प्राधान्याने लक्ष घालावे अशी मागणी परिचारिकांनी केली आहे. तुम्ही कामाच्या ठिकाणी हजर व्हा नाहीतर कारवाई केली जाईल, अशी तंबी पालिका अधिकारी देत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2020 4:35 am

Web Title: nurses of kalyan dombivli municipal medical department protest for salary hike zws 70
Next Stories
1 मीरा-भाईंदरमध्ये करोनाच्या मृत्यूत ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी
2 करोनाकेंद्रातील रुग्णांचे हाल
3 टाळेबंदीमुळे रानमेव्यापाठोपाठ रानभाज्यांवरही संक्रांत
Just Now!
X