कल्याण-शिळफाटा रस्त्याजवळील जागेत उभारणी; उपचारांसोबत निवाराही मिळणार

शहराच्या गर्दीत वावरताना जखमी अवस्थेत आपला जीव वाचवण्याची केविलवाणी धडपड करणाऱ्या वन्यजीवांना एकाच ठिकाणी योग्य सुविधा मिळाव्यात आणि उपचार होईपर्यंत या वन्यजीवांना हक्काचे घर मिळावे यासाठी ठाणे वन विभागातर्फे वन्यजीवांसाठी सेवाशुश्रूषा केंद्र उभारण्यात येणार आहे. कल्याण शिळफाटा रस्त्याजवळील वन विभागाच्या जागेतच शासनाच्या निधीतून हे केंद्र उभारण्यात येणार आहे. हवेत विहार करण्याचा आत्मविश्वास गमावलेल्या पक्ष्यांसाठी प्रशिक्षण विभाग, वैद्यकीय खोली, शस्त्रक्रिया विभाग अशा वेगवेगळ्या सुविधांनी सुसज्ज असे हे केंद्र वन्यजीवांसाठी हक्काचे घरकुल ठरणार आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे बिबटय़ा बचाव केंद्र आणि भायखळा येथील राणीच्या बागेतील प्राण्यांसाठी बचाव केंद्र याव्यतिरिक्त बाहेरील वन्यजीवांच्या सेवेसाठी बचाव केंद्र शहरात अस्तित्वात नाही. विविध प्राणीसंस्था, प्राणीप्रेमी यांच्याकडे जखमी अवस्थेत सापडलेले पक्षी, प्राणी ठेवण्यात येत असले तरी काहीवेळा अपुऱ्या जागेमुळे या वन्यजीवांचा बचाव करणे कठीण जाते. यासाठी ठाणे वन विभाग आणि काही वन्यजीव संस्था यांच्या प्रयत्नातून वन्यजीवांच्या वास्तव्यासाठी हे बचाव केंद्र उभारण्यात येत असल्याचे ठाणे वन विभागाकडून सांगण्यात आले.

बचाव केंद्राच्या माध्यमातून जखमी अवस्थेत सापडणारे विविध पक्षी, साप, माकड, खार अशा अनेक वन्यजीवांना एकाच ठिकाणी आधार मिळणार आहे, असे वन विभागाचे मानद वन्यजीवरक्षक पवन शर्मा यांनी सांगितले.

शहरात घार हा पक्षी मोठय़ा प्रमाणात जखमी अवस्थेत सापडतो. पंखाला जखम झाल्याने अनेकदा हे पक्षी आपला आत्मविश्वास हरवून बसतात. यासाठी उपचार झाल्यानंतर त्यांना देखरेखेखाली ठेवून त्यांना स्वत: खाण्याची सवय लावणे, उडण्याची सवय लावणे या प्रक्रिया पार पाडाव्या लागतात. यासाठी या सेवाशुश्रूषा केंद्रात अशा पक्ष्यांसाठी स्वतंत्र विभाग तयार करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

सुविधा काय?

  • अनुभवी पशुवैद्यकांचे पथक
  • प्राणी-पक्षी प्रशिक्षक
  • गंभीर जखमी झालेल्या वन्यजीवांसाठी अतिदक्षता विभाग
  • शस्त्रक्रिया विभाग
  • प्राणीप्रेमी स्वयंसेवक
  • संसर्ग होऊ नये यासाठी प्राणी, पक्षी, आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचा स्वतंत्र विभाग
  • प्राण्यांचे खाद्यपदार्थ ठेवण्यासाठी स्वतंत्र खोली

ठाणे वन विभागातर्फे या वन्यजीव केंद्रासाठी आतापर्यंत १५ लाख एवढा निधी खर्च करण्यात आलेला आहे. याशिवाय २५ लाखाची मागणी शासनाकडे ठाणे वन विभागातर्फे करण्यात आलेली आहे. तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यावर शासनाकडून हा निधी उपलब्ध होईल. उपचार झाल्यावर वन्यजीवांची संपूर्ण काळजी या केंद्रात घेण्यात येईल.

डॉ. जितेंद्र रामगावकर, उपवनसंरक्षक, ठाणे वन विभाग