कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त ई. रवींद्रन यांनी शहरातील बेकायदा फेरीवाल्यांविरोधात जोरदार मोहीम सुरू केली आहे. मागील २० वर्षांपासून कल्याण-डोंबिवली शहरांमधील रेल्वे स्थानक परिसर फेरीवाल्यांनी काबीज केला आहे. फेरीवाले, महापालिका कर्मचारी तसेच काही अधिकारी, नगरसेवक, गावगुंड यांच्या अभेद्य साखळीचा या फेरीवाल्यांना वर्षांनुवर्षे आशीर्वाद आहे. ही साखळी मोडून काढण्यासाठी नवे महापौर आणि आयुक्तांनी कंबर कसली आहे. निवडणुका जवळ आल्या की रेल्वे स्थानक परिसर फेरीवालामुक्त करा यासाठी दौरे करणारे नेते या फेरीवाल्यांचे वर्षांनुवर्षे आश्रयदाते राहिले आहेत. या आश्रयदात्यांना महापौर आणि आयुक्त जुमानणार नाहीत अशी अपेक्षा आहे.
कल्याण-डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांना हटविण्याची कारवाई गेला आठवडाभर सलग सुरू आहे. त्यामुळे रस्ते, पदपथ काबीज करून बसलेल्या फेरीवाल्यांची दाणादाण उडाली आहे. महापालिका कर्मचारी नेहमीप्रमाणे दोन दिवस कारवाई करतील आणि थंड बसतील असा यापैकी अनेकांचा अंदाज होता. तो महापालिकेने फोल ठरविला आहे. महापालिकेतील नवी राजकीय व्यवस्था आणि कडक प्रशासकीय नेतृत्व यामुळे हे चित्र दिसत आहे. त्यामुळे प्रभाग क्षेत्र अधिकारी, फेरीवाला हटाव पथकातील कर्मचाऱ्यांचा नाइलाज होऊन बसला आहे.
एरवी कल्याण-डोंबिवली रेल्वे स्थानकांचा परिसर म्हणजे गोंधळ बाजार होऊन बसला आहे. अपवाद फक्त डोंबिवली पश्चिमेचा. कल्याण पश्चिम, पूर्व, डोंबिवली पूर्व परिसर नेहमीच फेरीवाल्यांनी गजबजलेला असतो. काबीज केलेल्या रस्ते, पदपथांमधून वाट काढत चाकरमानी रेल्वे स्थानक आणि घर गाठत असतो. वर्षांनुवर्षे एकाच जागी बसून व्यवसाय करणाऱ्या या फेरीवाल्यांना महापालिकेतील व्यवस्थेचा पाठिंबा असणारच हे कल्याण-डोंबिवलीकरांनाही एव्हाना ठाऊक झाले आहे. महापालिकेत लोकप्रतिनिधी राजवट आली तेव्हापासून बेकायदा फेरीवाल्यांचा विषय येथील सभांमधून गाजत असतो. त्यावर तासन् तास चर्चा होते. सभागृहात चर्चा झाली की दोन दिवस फेरीवाल्यांना हटविण्याचा कारवाईचा देखावा उभा करण्यात येतो. पुन्हा ये रे माझ्या मागल्या असे चित्र येथे नेहमीच दिसते.
मुंबई परिसरातून फेरीवाले हटविताच त्यामधील निम्म्याहून अधिक फेरीवाले कल्याण, डोंबिवली आणि ठाणे शहराकडे सरकले. मुंबईत दररोज कारवाई होऊन साहित्य जप्त होत असल्याने दररोजचे नुकसान परवडणारे नसल्याने या फेरीवाल्यांनी कल्याण, डोंबिवलीतील ‘सुरक्षित’ स्थानके पकडली. त्यामुळे भायखळा, मस्जिद बंदर, फोर्ट, मुंब्रा, कुर्ला परिसरात वास्तव्य करणारे फेरीवाले सध्या कल्याण, डोंबिवलीकर बनले आहेत. कल्याण, डोंबिवली परिसराच्या वेशीवर हजारो बेकायदा चाळी उभ्या राहिल्या आहेत. या चाळींमध्ये हजार ते दोन हजार रुपयांमध्ये भाडय़ाने जागा मिळते. सात ते आठ फेरीवाले मिळून या चाळींमध्ये भाडय़ाने जागा घेतात. बक्कळ कमाई आणि खर्च मात्र किरकोळ. या गणितामुळे संस्थापक फेरीवाल्यांनी कल्याण-डोंबिवली ही मोठी बाजारपेठ आहे असा विचार करून आपले सगेसोयगरे, नातेवाईक कल्याण, डोंबिवलीतील रस्त्यांवर व्यवसाय करण्यासाठी आणून बसविले आहेत.
महापालिकेत बाजार शुल्क वसुली विभाग आहे. या विभागाला दरवर्षी कल्याण, डोंबिवली विभागातून फेरीवाला क्षेत्रात रस्ते, पदपथाच्या बाजूला बसलेल्या फेरीवाल्यांकडून दरमहा १० ते १५ रुपयांप्रमाणे वसुली करावी लागते. महापालिकेच्या महसुलाचा हा एक भाग आहे. दरवर्षी महापालिकेला सुमारे तीन ते चार कोटी रुपयांचा महसूल या माध्यमातून मिळतो. महापालिकेने आखलेला फेरीवाला विभाग रेल्वे स्थानकांपासून सुमारे दोनशे ते तीनशे मीटर दूर असल्याने त्या भागात फेरीवाले बसण्यास तयार नाहीत. ते रेल्वे स्थानक परिसरातच ठाण मांडून बसतात. बाजार शुल्क वसुली विभागातील चतुर अधिकारी रेल्वे स्थानक भागात बसणाऱ्या फेरीवाल्यांकडून आपले वसुलीचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी बाजार शुल्क वसुली नियमबाह्य़पणे करीत आहेत.
साडेचार वर्षांपूर्वी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत फेरीवाल्यांचा विषय चर्चेला आला होता. दोन ते तीन तास फेरीवाला विषयावर घणाघाती चर्चा सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली. अधिकारी, कर्मचारी फेरीवाल्यांकडून कसे हप्ते खातात. येथपर्यंत आरोप-प्रत्यारोप झाले. सर्वसाधारण सभेत झालेल्या घणाघाती चर्चेनंतर तत्कालीन आयुक्त रामनाथ सोनवणे यांनी कल्याण-डोंबिवली रेल्वे स्थानक परिसर फेरीवालामुक्त करण्याचे आश्वासन सभागृहाला दिले होते. काही महिने फेरीवाल्यांना हटविण्याची कारवाई कर्मचाऱ्यांकडून नित्यनियमाने करण्यात येत होती. नंतर मात्र ही कारवाई थंडावली. शहरातील इतर भागात फेरीवाल्यांना राजाश्रय प्राप्त करून दिला जात असताना डोंबिवली पश्चिमेत ‘ह’ प्रभाग कार्यालयातील बाजीराव अहिर आणि त्यांचे पथक नित्यनियमाने फेरीवाल्यांना हटविण्याची कारवाई करीत होते. साहित्य जप्त करण्यात येत होते. फेरीवाल्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. फेरीवाला हटाव पथकावर अनेक आरोप झाले. त्या परिस्थितीला तोंड देत बाजीराव अहिर यांच्या पथकाने गेल्या साडेचार वर्षांत डोंबिवली पश्चिमेतील फेरीवाल्यांचा उपद्रव रोखण्यात यश मिळवले. आजही त्यांची कारवाई तेवढय़ाच तडफेने सुरू आहे. त्यामुळे डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानक परिसर फेरीवालामुक्त झाला. डोंबिवली पश्चिम परिसर फेरीवालामुक्त होऊ शकतो तर इतर भागांत असे चित्र का दिसत नाही, हा खरा सवाल आहे. वर्षांनुवर्षे ठरावीक कर्मचारी फेरीवाला हटाव पथकात कार्यरत असल्याने त्यापैकी अनेकांचे फेरीवाल्यांसोबत लागेबांधे तयार झाले आहेत. काही फेरीवाल्यांचे नाके आजी-माजी नगरसेवकांचे ‘दुकान’ होऊन बसले आहे. कल्याणमध्ये एक माजी नगरसेवकच फेरीवाला संघटनेचे नेतृत्व करतो. या नगरसेवकाने सभागृहात नेहमीच फेरीवाल्यांची बाजू घेऊन त्यांचे समर्थन केले आहे. आयुक्त रवींद्रन यांच्या कार्यकाळात चित्र बदलत असल्याचे दिसू लागले आहे. दिवाळी सणात काही महापालिका अधिकाऱ्यांनी आपण कसे आयुक्तांच्या जवळचे आहोत हे दाखविण्यासाठी आयुक्तांच्या बंगल्यावर जाऊन दिवाळी भेट देण्याचा प्रयत्न केला. चतुर आयुक्तांनी सर्वच अधिकाऱ्यांच्या त्या भेटी आल्या दाराने त्यांना साभार पोच केल्या. काही अधिकाऱ्यांनी तर आयुक्तांच्या बंगल्याबाहेरील सुरक्षा चौकीत भेटी ठेवून तेथून पळ काढला. त्यामुळे नेहमीच आयुक्त, काही उपायुक्तांना किरणा, ताजी फळे, पारनाक्यावरील पहिल्या धारेचे दूध पोहोचविणाऱ्या अधिकाऱ्यांचे यापुढे फारसे काही चालणार नाही, असेच सध्याचे चित्र आहे.
‘लक्ष्मीबाजारा’चे दुखणे संपवा!
कल्याणमधील महालक्ष्मी हॉटेलजवळील लक्ष्मी भाजीबाजार म्हणजे काही ठरावीक दलालांचे दुकान आहे. या बाजारामुळे रेल्वे स्थानक परिसर अडकून पडला आहे. या ठिकाणाहून अनेक दलालांचे पोट भरते. त्यामुळे हा भाजीबाजार प्रशस्त कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात जावा असे येथील काही दलालांना वाटत नाही. लक्ष्मी भाजीबाजार बाजार समितीच्या आवारात स्थलांतरित करावा असा निर्णय सर्वसाधारण सभेने चार वर्षांपूर्वी घेतला आहे. ठरावांची अंमलबजावणी करायची नाही असा अलिखित नियम महापालिकेत असल्याने त्याचा गैरफायदा काही अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी उचलला. लक्ष्मी बाजारातून भाजी खरेदी करायची, रेल्वे स्थानकालगत रस्त्यावर दुकान थाटून व्यवसाय करायचा, उरलेला माल तेथील कचराकुंडीत टाकून निघून जायचे ही येथील विक्रेत्यांची पद्धत आहे. गेल्या सात दिवसांपासून लक्ष्मी बाजार हटविण्यासाठी पहाटेपासून कारवाई सुरू होत आहे. डोंबिवलीत फ प्रभागाने मागील सात दिवसांपासून फेरीवाल्यांना हटविण्याची कारवाई सुरू केली आहे. आयुक्त ई. रवींद्रन यांनी फेरीवाल्यांना रेल्वे स्थानकापासून हटविण्याचा निर्धार केला आहे. महापौर राजेंद्र देवळेकर त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. त्यामुळे येत्या काळात कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरातील रस्ते मोकळा श्वास घेतील आणि सर्वसामान्यांचे फेरीवाल्यांच्या सामानात अडकणारे पाय मुक्तपणे चालू शकतील, अशी अपेक्षा बाळगण्यासारखे सध्याचे चित्र आहे.