काम थांबल्यामुळे ‘एमएआरडीए’ची महानगरपालिकेकडे धाव

भाईंदर : मीरा-भाईंदर मेट्रोचे काम प्रगतिपथावर असताना अडथळे निर्माण झाले असल्याचे समोर आले आहे. भाईंदर पश्चिमेकडील  एका विकासकाने  मेट्रोच्या खांबांसाठी केलेले खोदकाम थांबविले आहे. ज्या जागेकर खोदकाम होत आहे, त्या जागेचे विकास हक्क हस्तांतर पत्र महानगरपालिकेने दिले नाही, असे विकासकाचे म्हणणे आहे. या प्रकरणी एमएमआरडीएने फेब्रुवारी ते जून या कालावधीत महानगरपालिकेला दोन पत्रे पाठवली असून पालिका प्रशासनाकडून अद्यापही निर्णय झालेला नाही.

गेल्या वर्षभरापासून ‘दहिसर- मीरा-भाईंदर मेट्रो मार्ग ९’ या प्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. दहिसर चेकनाक्यावरून मेट्रो सरळ काशिमीरा नाक्यापर्यंत येणार असून नंतर ती थेट गोल्डन नेस्ट सर्कलपर्यंत जाणार आहे. या ठिकाणी डावीकडे उड्डाणपुलाजवळून ती भाईंदर पश्चिम येथील सुभाषचंद्र बोस मैदानपर्यंत जाणार आहे. एमएमआरडीने यासाठी नऊ ठिकाणी स्थानके उभारण्याच्या जागा निश्चित केल्या आहेत. त्याचप्रकारे मेट्रोच्या कामालाही सुरुवात करण्यात आली आहे. परंतु भाईंदर पश्चिम १५० फुट मार्गावर विकासाने चक्क काम थांबून विरोध केल्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.

२०२२पर्यंत मेट्रोचे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य एमएमआरडीएचे आहे. परंतु या अडथळ्यामुळे काम रखडण्याची शंका वर्तवण्यात येत आहे. या संदर्भात एमएमआरडीएने फेब्रुवारी ते जून या कालावधीत महानगरपालिकेला दोन पत्रे पाठवली असून समस्यांचे निवारण करण्याची मागणी केली आहे.

खर्च वाढण्याची भीती

मीरा-भाईंदर मेट्रोच्या बांधकामात अडथळा आल्यास प्रकल्पाचा कालावधी वाढून बांधकामाच्या खर्चात वाढ होऊ  शकते. त्यामुळे मेट्रोसाठी जागेसंबंधीच्या सर्व अडचणी दूर करून मीरा-भाईंदर महापालिकेने ‘एमएमआरडीए’ला आवश्यक ते सर्व सहकार्य करावे, अशी मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे.

विकास हक्क हस्तांतरऐवजी रोख रक्कम देण्याची मागणी विकासक करत आहे. परंतु लवकरच योग्यरीत्या निर्णय घेऊन काम मार्गी लावण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

– दीपक खांबित, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग