बेकायदा वाहनतळांना आवर घालण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांचा निर्णय

नौपाडा भागातील रस्त्यांच्या कडेला होणाऱ्या बेकायदा पार्किंगमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या भागात दिवसभरात आठ तासांनी पार्किंगच्या बाजूत बदल करण्याचा निर्णय ठाणे वाहतूक पोलिसांनी नुकताच घेतला आहे. त्यापाठोपाठ आता शहरातून जाणाऱ्या महामार्गालगतच्या सेवा रस्त्यांवरील बेकायदा पार्किंगकडे पोलिसांनी मोर्चा वळवला आहे. सेवा रस्त्यांवर कुठेही, कशीही वाहने उभी केल्याने रहदारीस होणारा अडथळा दूर करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी या रस्त्यांवर सम-विषम तारखेनुसार पार्किंगची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठाणे शहरातून मुंबई-नाशिक महामार्ग तर घोडबंदर भागातून मुंबई-अहमदाबाद महामार्ग जातो. या दोन्ही महामार्गाना जोडून शहरांतर्गत वाहतुकीसाठी सेवा रस्ते तयार करण्यात आले आहेत. मात्र मुख्य रस्त्यावरील वाहनांची गर्दी वाढू लागल्यानंतर सेवा रस्त्यांवरील वाहतूक कोंडीही वाढू लागली आहे. या पट्टय़ात पुरेसे वाहनतळ नसल्याने सेवा रस्त्याच्या आजूबाजूला असलेल्या इमारती तसेच आस्थापनांत येणारे आपली वाहने सेवा रस्त्याच्या कडेला उभी करतात. तसेच सेवा रस्त्यांलगत वाहनविक्रीची तसेच दुरुस्तीची दुकानेही सुरू आहेत. या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात वाहने उभी करण्यात येतात. परिणामत: सेवा रस्त्यांवर वाहतूक कोंडी होण्याचे प्रकार वाढत चालले आहेत.

या बेकायदा पार्किंगविरोधात वाहतूक पोलिसांकडून ठरावीक कालावधीने कारवाई केली जाते; परंतु पोलिसांची पाठ फिरताच या रस्त्यांवर पुन्हा बेशिस्तपणे वाहने उभी केली जातात. या पाश्र्वभूमीवर या रस्त्यांवर सम-विषम तारखेनुसार पार्किंग करण्याचा प्रस्ताव वाहतूक पोलिसांनी पुढे आणला आहे. ‘सेवा रस्त्यांवरील बेकायदा पार्किंगला शिस्त लागावी व वाहतुकीसाठी रस्ता मोकळा राहावा, यासाठी सम-विषम पार्किंगची व्यवस्था सुरू करण्याचा विचार आहे,’ असे ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी सांगितले. कोणत्या भागात ही व्यवस्था सुरू करायची, त्या ठिकाणी किती वाहने एकाचवेळी उभी करता येतील, या पार्किंगचा वाहतुकीवर काय परिणाम होईल, यासंदर्भात अभ्यास करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.

सेवा रस्त्यांलगत जुनी आणि नवीन वाहन विक्रेत्यांची कार्यालये असून ते विक्रीसाठी असलेली वाहने सेवा रस्त्यांवर उभी ठेवतात. महिनोन्महिने ही वाहने त्या ठिकाणी उभी करून जागा अडविण्यात येते. तसेच गॅरेजवालेसुद्धा अशाच प्रकारे दुरुस्तीसाठी आलेली वाहने सेवा रस्त्यांवर उभी ठेवतात. त्याचप्रमाणे हॉटेल व्यावसायिक ग्राहकांची वाहने सेवा रस्त्यांवर उभी करतात. मात्र, सम-विषम पार्किंगमुळे आता त्यांना नेहमीची जागा अडविता येणार नसल्याने त्यांच्या बेकायदा पार्किंगला लगाम बसण्याची शक्यता वाहतूक पोलिसांकडून व्यक्त होत आहे.