समस्या संकुलांच्या  : मयूर ठाकूर

ताजमहल सोसायटी, भाईंदर:-भाईंदर पूर्वेला असलेली ताजमहल सोसायटी ही मुख्य रस्त्यालाच असलेली सोसायटी आहे. भाईंदरमधील प्रसिद्ध आणि जुन्या सोसायटय़ांपैकी ही एक सोसायटी असून या सोसायटीतील समस्याही तितक्याच जुन्या आहेत. ताजमहाल सोसायटीमध्ये दरुगधी, पाणीटंचाई आणि ध्वनिप्रदूषण अशा मोठय़ा समस्या आहेत. रहिवाशी याबाबत वारंवार तक्रार करून कंटाळले आहेत. तसेच या ठिकाणी पालिकेकडून आजवर कुठल्याही प्रकारची रोगप्रतिबंधक फवारणी करण्यात न आल्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.

ताजमहल सोसायटी ही मोठी आहे. इमारतीत पाच वेगवेगळ्या विंग आहेत. तसेच सोसायटीत राहाणाऱ्यांची संख्याही ६००च्या घरात आहे. ताजमहल सोसायटी ही भाईंदरमधील एक प्रशस्त सोसायटी म्हणून ओळखली जाते. ही सोसायटी बरीच वर्षे जुनी असल्याने इथल्या समस्यातही सतत भर पडत चालली आहे. औद्योगिक वसाहतीजवळ असल्यामुळे ध्वनिप्रदूषण, विषारी वायू अशा अनेक  समस्यांचा स्थानिक रहिवाशांना नाईलाजाने त्रास सहन करावा लागत आहे.

मीरा-भाईंदर महानगरपालिकेने या सोसायटीला कचऱ्याचे डब्बे दिले असले तरी हे कचऱ्याचे डबे वेळेवर उचलले जात नसल्याने नागरिकांना अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात हा कचरा भिजत असल्याने सोसायटीमध्ये दरुगधी पसरत आहे. तसेच नागरिकांना आजार होण्याची शक्यता देखील वाढत आहे. ताजमहल सोसायटीच्या चहूबाजूने दरुगधी पसरलेली असल्यामुळे सोसायटीमधील नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत. अनेक वेळा तक्रारी करून देखील आजवर तोडगा निघालेला नाही.

वाहनतळाची असुविधा.

ताजमहाल सोसायटी परिसरात चारचाकी वाहन उभे करण्याची कुठलीच सुविधा उपलब्ध नाही. शिवाय सोसायटीबाहेरील रस्ता हा अरुंद आणि वर्दळीचा असल्यामुळे सातत्याने त्यावर वाहन उभे करणे शक्य होत नाही. कित्येक रहिवाशांना चारचाकी गाडी घ्यायची आहे परंतु वाहनतळाची सोय नसल्यामुळे गाडी विकत घेऊ शकत नाही.

लोकप्रतिनिधी निवडणुकीनंतर  फिरकले नाही.

ताजमहल ही सोसायटी प्रभाग क्रमांक ४ मध्ये येते. महानगरपालिकेच्या निवडणुकीत येथील नागरिकांनी नगरसेवकांना मत देऊन निवडून आणले. परंतु निवडून आलेल्या नगरसेवकांपैकी एकही नगरसेवक सोसायटीमध्ये अजूनही फिरकला नसल्याची तक्रार येथील रहिवाशी करत आहेत. ताजमहल सोसायटी  मुख्य  रस्त्याला  लागून असल्यामुळे सातत्याने वाहनांच्या कर्णकर्कश्श हॉनचा आवाज रात्रंदिवस भेडसावत असतो. त्याचप्रमाणे सोसायटीच्या  मागील परिसरात औद्दय़ोगिक वसाहत  असल्यामुळे  कारखान्यातील  यंत्रांचा  मोठय़ा प्रमाणात आवाज  येत असतो. पाणीटंचाई ही इथली कायमची समस्या आहे. शहरात  पाणी साठा मुबलक असला तरी ताजमहल  सोसायटी मध्ये अनेक वेळा  पाणीटंचाई सुरू असते. पूर्वी पाणीटंचाईचा प्रश्न संपूर्ण मीरा-भाईंदरला भेडसावत होता परंतु शासनाकडून अधिक प्रमाणात  पाणी पुरवठा उपलब्ध झाला असला तरी  सोसायटी मध्ये अनेक वेळा आठवडय़ातून  २ दिवस पाणीच येत नाही.  गेल्या अनेक वर्षांपासून रहिवाशी पाणीटंचाई मुळे हैराण आहेत.नियमित वेळी पाणी मिळत नसल्याने रहिवाश्यांनी दैनंदिन कामे देखील करण्यात त्यांना त्रास होत आहे.

पाणी तुंबण्याची समस्या

ताजमहल सोसायटी ही ३४ वर्षांपूर्वी बांधण्यात आली आहे. मुख्य रस्ता सोसायटीच्या इमारतीच्या पायापेक्षाही उंच झाला आहे. त्यामुळे सोसायटी परिसरात पाणी साचते. त्याचप्रमाणे भाईंदर पूर्वेला खाडी असल्यामुळे भरती आणि अतिवृष्टीनंतर सोसायटीत मोठय़ा प्रमाणात पाणी तुंबत असते. याचा सर्वाधिक फटका तळमजल्यावरील रहिवाशांना सोसावा लागत आहे. पावसाळ्यात त्यांच्यात सतत भीतीचे वातावरण असते.