कंजारभाट समाजातील तरुणावरील बहिष्काराचे प्रकरण

अंबरनाथ : कौमार्य चाचणीला नकार देणाऱ्या विवेक तमायचीकर यांच्या कुटुंबावर बहिष्कार टाकणाऱ्या कंजारभाट समाजातील जात पंचायतीच्या सदस्यांवर बुधवारी रात्री उशिरा अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विवेक तमायचीकर हे कंजारभाट समाजाचे असून त्यांनी कौमार्य चाचणीला विरोध करत कौमार्य चाचणीविरुद्ध चळवळही सुरू केली होती. यामुळे समाजातील जात पंचायतीच्या भावना दुखावल्या होत्या. त्यामुळे अंबरनाथमधील जात पंचायतीने त्याच्या कुटुंबीयांवर बहिष्कार घालण्याचे फर्मान काढले होते, असा आरोप विवेकने केला आहे. १३ मे रोजी विवेकची आजी रोमलाबाई तमायचीकर यांचे निधन झाले. आजीच्या अंत्ययात्रेलादेखील समाजाचा बहिष्कार कायम होता. विवेक यांच्या आजीचे निधन झाले, त्या दिवशी अंबरनाथमध्ये समाजातील एका कुटुंबात लग्न सोहळ्यानिमित्त हळदीचा कार्यक्रम सुरू होता. या कार्यक्रमादरम्यान विवेकच्या आजीच्या अंत्ययात्रेला कुणीही जाऊ नये, असे आवाहन करणारे भाषण जात पंचायतीचे सरपंच संगम गारुंगे यांनी केले होते. ती चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित झाली होती. या प्रकरणी बुधवारी विवेक यांनी अंबरनाथ पोलीस ठाण्यात सामाजिक बहिष्कार प्रतिबंध व निवारण अधिनियमान्वये संगम गारुंगे, भूषण ऊर्फ रिंकू गारुंगे, करण गारुंगे आणि अविनाश गागडे या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील पुरव्यांच्या पडताळणीनंतर आरोपींवर कारवाई केली जाणार असल्याचे साहाय्यक पोलीस आयुक्त सुनील पाटील यांनी सांगितले.

गुन्हा दाखल केलेल्या व्यक्तींसोबत काही वैयक्तिक मतभेद नाहीत. मात्र जात पंचायतीच्या चुकीच्या रूढींविरुद्ध माझा लढा आहे. शासनाने अशा पंचायतींच्या सदस्यांचे समुपदेशन करण्याची आवश्यकता आहे.

– विवेक तमायचीकर, पीडित तरुण