ठाण्याच्या नौपाडा येथील पेट्रोलपंप भागातील शिधावाटप कार्यालयात सकाळी सहाय्यक रेशनिंग नियंत्रण अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली. प्रकाश सीताराम परदेशी असे आत्महत्या करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे. त्यांनी प्रथम डाव्या हाताची नस कापून घेतली. त्यानंतर त्यांनी नायलॉन दोरीने गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले. बुधवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास ही घटना घडली. घटनास्थळी नौपाडा पोलिसांना सुसाईड नोट सापडली आहे. यात त्यांनी पत्नी सोडून गेल्यामुळे नैराश्यातून आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

प्रकाश परदेशी हे ठाण्याच्या शिधा वाटप कार्यालयात सहाय्यक निरीक्षक म्हणून कार्यरत होते. सकाळी नेहमीप्रमाणे ते कार्यालयात आले. कार्यालयात त्यांनी आतून दरवाजा बंद करून घेतला. कार्यालयात शिधावाटप निरीक्षक असलेले मोरे आल्यानंतर त्यांनी जाऊन परदेशी यांच्या कार्यालयाचा दरवाजा ठोठावला. अन्य अधिकारी वर्ग हे दरवाजा ठोठावू लागले. मात्र, दरवाजा उघडण्यात आला नाही. मोरे यांनी फोन लावला मात्र फोन उचलण्यात आला नाही. त्यानंतर दरवाजा सर्वांनी उघडला तर परदेशी यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले. नौपाडा पोलिसांना देताच त्यांनी घटनास्थळी येऊन परदेशी यांच्या मृतदेहाचा पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला.

नौपाडा पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोट लिहलेली आढळली. त्या नोट मध्ये ‘माय वाईफ इज माय लाईफ’ असे लिहले होते. दरम्यान याबाबत नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, परदेशी यांचे काही वर्षांपूर्वी दुसरे लग्न झाले होते. तीही पत्नी त्यांना सोडून गेल्याने परदेशी यांनी नैराश्यातून आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
घटनास्थळाचा प्राथमिक दर्शनी आत्महत्यापुर्वी परदेशी यांनी डाव्या हाताची नास कापून आत्महत्येचा असफल प्रयत्न केला त्यानंतर नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जाधव यांनी दिली.