बदलापूर टीडीआर घोटाळा
कुळगांव-बदलापूर नगरपालिकेच्या टीडीआर (विकास हस्तांतरण हक्क) घोटाळ्याप्रकरणी कल्याण सत्र न्यायालयाने सहा अधिकाऱ्यांचे अटकपूर्व जामीन अर्ज शुक्रवारी दुपारी फेटाळले आहेत. यात तत्कालीन मुख्याधिकारी भालचंद्र गोसावी, साहाय्यक नगररचनाकार सुनील दुसाने, शहर अभियंता तुकाराम मांडेकर, उपअभियंता अशोक पेडणेकर, प्रभाग अभियंता नीलेश देशमुख आणि किरण गवळे यांचा समावेश आहे. त्यामुळे या पालिकेच्या आजी-माजी अधिकाऱ्यांना आता कोणत्याही क्षणी अटक होऊ शकणार आहे.
कुळगांव-बदलापूर नगरपालिका हद्दीतील टीडीआर (विकास हस्तांतरण हक्क) देताना ५५ प्रकरणांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करीत अनेकांनी याविरोधात तक्रारी दाखल केल्या होत्या. तसेच या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिकाही दाखल करण्यात आली होती. त्यामुळे ठाण्याच्या आर्थिक गुन्हे शोध शाखेने या प्रकरणात प्राथमिक तपास करून बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात या ५५ प्रकरणांमध्ये मिळून २० कोटी रुपयांचा अपहार करून शासनाचे नुकसान केल्याबद्दल गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून बदलापूर नगरपालिकेतील हे अधिकारी गायब झाल्याचे बोलले जात होते. त्यांनी कल्याण येथील सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठीही अर्ज दाखल केला होता. त्यावर न्यायालयाने शुक्रवारी दुपारी या सर्वाचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावले आहेत. त्यामुळे या अधिकाऱ्यांना आता कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. अशी माहिती या प्रकरणाचे तपास अधिकारी नागेश जाधव यांनी दिली आहे.