१० दिवसांत खड्डे बुजवण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश;रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत अधिकाऱ्यांची खरडपट्टी

ठाणे, पालघर आणि रायगड या तिन्ही जिल्ह्यांतील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत सर्वसामान्य नागरिकांमधून होत असलेल्या संतापाच्या पाश्र्वभूमीवर गुरुवारी ठाणे नियोजन भवनात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत या जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम तसेच राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. येत्या दहा दिवसांत खड्डे बुजवा, अन्यथा कारवाईला सज्ज राहा, असा इशारा मंत्र्यांनी दिला आहे. त्यामुळे खड्डेमुक्तीसाठी आधी गणेश चतुर्थी, मग गणेश विसर्जन अशा मुदती टळल्यानंतर आता नवरात्रोत्सवापूर्वीची मुदत प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्य़ांतील नागरिकांना गेल्या काही महिन्यांपासून खड्डय़ांमधून प्रवास करावा लागत असून उशिरा जाग आलेल्या संबंधित यंत्रणांनी गुरुवारी ठाणे नियोजन भवनात खड्डय़ांची समस्या सोडवण्यासाठी बैठक आयोजित केली होती. या बैठकीला ठाणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे तसेच पालघर आणि रायगड जिल्ह्य़ाचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, राज्य व रस्ते विकास महामंडळ, सिडको, वाहतूक पोलीस, जिल्हा प्रशासन आणि महापालिका अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांनी तिन्ही जिल्ह्य़ांमधील रस्त्यांवर पडलेल्या खड्डय़ांचा आणि त्यावर करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला.

रस्त्यांच्या दुर्दशेमुळे होणारी वाहतूक कोंडी आणि त्यामुळे नागरिकांना सहन करावा लागणारा त्रास याबाबत दोन्ही पालकमंत्र्यांनी अनेक उदाहरणे देऊन संबंधित विभागांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.

ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर तसेच ग्रामीण भागात पडलेल्या खड्डय़ांच्या मुद्दय़ावरून पालकमंत्री शिंदे यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.

रखडलेली कामे मार्गी लावा

पत्री पूल, मोठा गावा, दुर्गाडी पूल, मानकोली आणि कोपरी पुलाची कामे रखडल्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असून या कोंडीतून नागरिकांना प्रवास करावा लागतो आहे. त्यामुळे या कामांचा आढावा घेऊन रखडलेल्या कामांच्या मुद्दय़ावरून दोन्ही पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तसेच रखडलेली कामे लवकर मार्गी लावा अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना या वेळी दिल्या.

टोलबंदीचा सूर

रायगड आणि पालघर जिल्ह्य़ाचे पालकमंत्री आणि भाजपचे नेते रवींद्र  चव्हाण यांनी खड्डय़ांवरून संताप व्यक्त करतानाच खड्डे बुजविता येत नसतील तर टोल वसुली बंद करा अशा भावना व्यक्त केल्या. चव्हाण हे संतापाच्या भरात बोलत असल्याचे लक्षात येताच शिवसेनेचे नेते आणि ठाणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या भावनांना आवर घालून हा विषय बदलला. दरम्यान, बैठकीनंतर टोल वसुली बंदीबाबत पत्रकारांनी शिंदे यांना प्रश्न विचारले असता, खड्डे बुजविले गेले नाही तर संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे सांगून त्यांनी टोल वसुली बंदीबाबत बोलणे टाळले.