स्थानक परिसरात रिक्षाचालकांची दादागिरी; ‘आरटीओ’च्या नावे फलक

प्रवाशांना स्वस्त आणि दर्जेदार सेवा पुरवणाऱ्या ओला, उबर, मेरू, टॅब या टॅक्सीसेवेचा धसका घेतलेल्या रिक्षा, टॅक्सी संघटनांनी कल्याणमध्ये या गाडय़ांना स्वत:हूनच ‘प्रवेशबंदी’ जाहीर केली आहे. ‘खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाडय़ांना कल्याण स्थानक परिसरात प्रतिबंध करण्यात येत आहे’ असे फलक कल्याण स्थानक परिसरात लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, या फलकांवर ‘आदेशावरून’च्या खाली ‘उपप्रादेशिक परिवहन विभाग’ असे नाव लावण्यात आले आहे. त्यामुळे हे आदेश परिवहन विभागाचे असल्याचा संभ्रम होत आहे. हे सगळे इतके उघडपणे सुरू असताना परिवहन विभागाने मात्र याकडे साफ दुर्लक्ष केले आहे, तर दुसरीकडे, रिक्षाचालकांकडून प्रवाशांची लूट सुरूच आहे.

कल्याण स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मीटर रिक्षा चालवणार नाही, मनमानी भाडे आकारणार, प्रीपेड सेवा देणार नाही, वाटेल तेथे थांबे तयार करणार, अशी प्रवासीविरोधी भूमिका घेऊन रिक्षाचालकांनी नेहमीच उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या नियमांना हरताळ फासला आहे. स्थानकाबाहेरील प्रवासी वाहतुकीस रिक्षाशिवाय अन्य कोणताही पर्याय नसावा, यासाठी रिक्षाचालक संघटनांनी नेहमीच प्रयत्न केले. पालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या बसगाडय़ांचीही स्थानक परिसरात अनेकदा अडवणूक करण्यात येते. तोच प्रकार आता ओला, उबर, मेरू अशा आधुनिक टॅक्सीसेवांच्या बाबतीत सुरू झाला आहे. या सेवेला प्रवाशांची पसंती मिळत असल्याचे पाहून अस्वस्थ झालेल्या रिक्षाचालकांनी उपप्रादेशिक परिवहन विभागाच्याच नावाने फलकबाजी करून कल्याण स्थानक परिसरात अशा वाहनांना प्रतिबंध असल्याची दिशाभूल करण्यास सुरुवात केली आहे.

महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमध्ये प्रवाशांच्या मागणीनुसार सेवा देणाऱ्या ओला, उबर, मेरू या वाहन सेवेवर कोणत्याही प्रकारचे र्निबध नसताना कल्याण स्थानकात मात्र या वाहनांना प्रतिबंध करण्यात आल्याचे फलकामुळे प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. प्रादेशिक परिवहन विभागाने अशा प्रकारे कोणतेच फलक लावले नसून हे फलक रिक्षा-टॅक्सी संघटनांनी लावल्याचे म्हटले आहे.  त्यामुळे अशा दिशाभूल करणाऱ्या फलकांवर कारवाईची गरज असताना विभागाने याकडे दुर्लक्ष करून संघटनांच्या फसवणुकीत सहभाग घेतला असल्याचा आरोप होत आहे.

प्रवेश बंदी नाही..

कल्याण स्थानकात ओला, उबर, मेरू, टॅब प्रवाशांच्या मागणीनुसार येऊन तेथून प्रवाशांना इच्छित स्थळी सोडू शकतात. या वाहनांना शहरात कोणत्याही ठिकाणी सेवा देण्यास कोणतेही र्निबध नाहीत. त्यामुळे त्यांना कल्याण स्थानक परिसरातही प्रवेश बंदी करण्यात आलेली नाही. मात्र येथील रिक्षा थांब्यावर पार्किंग करण्यास या वाहनांना बंदी आहे, अशी माहिती आम्ही रिक्षा संघटनांना दिली होती. त्या आधारावर रिक्षा संघटनांकडून हे फलक लावण्यात आले आहेत.

-नंदकिशोर नाईक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, कल्याण