ठाणे : ठाणे स्थानक परिसरात ६८ वर्षीय वृद्घ महिला लाखो रुपयांचे दागिने रिक्षात विसरल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला होता. त्या रिक्षाचा शोध घेऊन ठाणे पोलिसांनी तिचे दागिने अवघ्या काही तासांत मिळवून दिले. हे दागिने परत करण्यासाठी तो रिक्षाचालकही त्या महिलेचा शोध घेत होता.

मीरा भाईंदर येथे राहणाऱ्या शांता शेट्टे (६८) या १५ मार्चला काही कामानिमित्ताने ठाण्यात आल्या होत्या. त्या मखमली तलाव येथून ठाणे स्थानकात जाण्यासाठी एका रिक्षात बसल्या. ही रिक्षा ठाणे रेल्वे स्थानकात आल्यानंतर त्या रिक्षातून उतरल्या. त्यानंतर ही रिक्षा तेथून निघून गेली. त्या वेळेस दागिन्यांची बॅग रिक्षातच विसरल्याची बाब त्यांच्या लक्षात आली. या बॅगेत सुमारे साडेसात तोळे सोन्याचे दागिने आणि १ हजार रुपयांची रोकड होती. या प्रकरणी त्यांनी ठाणेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची तात्काळ दखल घेऊन ठाणेनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगेश सावंत यांनी रिक्षाचा शोध सुरू केला. त्यासाठी ठाणे रेल्वे स्थानक व मखमली तलाव भागातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. त्यात त्यांना तो रिक्षाचालक दिसला. परंतु रिक्षाचा क्रमांक अस्पष्टपणे दिसत होता. मात्र अस्पष्ट दिसणाऱ्या अंकाच्या आधारे पथकाने ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयातून रिक्षाचालकाची माहिती मिळविली. त्यानंतर त्याच्याकडून पथकाने साडेसात तोळे सोने ताब्यात घेतले.